Join us

आशादायक चित्र : जीएसटी संकलनात १० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:48 IST

आशादायक चित्र : चालू आर्थिक वर्षातील सर्वाधिक वसुली; अर्थव्यवस्था रुळावर येण्यास प्रारंभ

नवी दिल्ली : गेले सहा महिने कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत. चालू आर्थिक वर्षातील ६ महिन्यात प्रथमच चांगल्या प्रकारचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन झाले आहे. मागील महिन्यापेक्षा या संकलनात दहा टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होऊ लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिन्यात देशातून संकलित झालेल्या जीएसटीची आकडेवारी अर्थ मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आली. या महिन्यात ९५,४८० कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात जमा झालेल्या जीएसटीपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे.सप्टेंबर महिन्यात जमा झालेल्या ९५,४८० कोटी रुपयांच्या जीएसटी पैकी १७,७४१ कोटी रुपये हे केंद्राच्या जीएसटीचे असून, २३,१३१ कोटी रुपये हे राज्यांच्या जीएसटीमधील आहेत. याशिवाय इंटिग्रेटेड जीएसटी म्हणून ४७,४८४ कोटी रुपये जमा झाले असून, सेसची रक्कम ७१२४ कोटी रुपये असल्याचे अर्थमंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले. या महिन्यामध्ये २२,४४२ कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील जीएसटीच्या रूपात जमा झाले आहेत.

मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत चालू वर्षी आयात केलेल्या वस्तू व देशांतर्गत दळणवळण या माध्यमातून जमा झालेल्या जीएसटीमध्ये मोठी वाढ झाली आहे. या दोन्ही प्रकारामध्ये अनुक्रमे १०२ आणि १०५ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे अर्थमंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.देशातील जीएसटीच्या संकलनात होत असलेल्या वाढीने अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होऊ लागल्याचे संकेत मिळत असल्याचे विविध अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात दसरा-दिवाळीसारखे मोठे सण असून, हा काळ खरेदीसाठीचा सर्वात चांगला काळ मानला जातो. या काळामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. तसेच त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्येही तेजी असते. याचा परिणाम आगामी महिन्यातील जीएसटी संकलन वाढण्यात होण्याची अपेक्षा असल्याचे मत अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ९१,९१६ कोटी रुपये जीएसटीचे संकलन झाले होते. त्या तुलनेत या महिन्यात झालेले संकलन हे चार टक्क्यांनी अधिक आहे. कोरोनाच्या संकटानंतर झालेली वाढ आशादायक असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत.आर्थिक वर्षातील सर्वाधिकच्देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने जीएसटी संकलनात एप्रिल महिन्यापासूनच घट झाली होती. जून महिन्यापासून काही प्रमाणात व्यवहार सुरू झाल्याने जीएसटीचे संकलन वाढत होते. आॅगस्ट महिन्यात देशभरातून ८६,४४९ कोटी रुपये जीएसटी वसूल झाला. त्यामध्ये चालू महिन्यात १० टक्क्यांनी वाढ होऊन तो ९५,४८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षातील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे.

टॅग्स :जीएसटीमुख्य जीएसटी कार्यालय