Join us  

म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आणि कोणते?; कुणामार्फत गुंतवता येतात पैसे?... जाणून घ्या 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 14, 2023 2:41 PM

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम गुंतविण्यासाठी विविध प्रकार उपलब्ध आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेऊ.

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक  विश्लेषक

म्युच्युअल फंड्स ऑपरेट करणाऱ्या अनेक संस्था आहेत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करताना नेमक्या कोणत्या संस्थेच्या फंडात रक्कम गुंतवावी याचा प्रश्न कोणालाही पडू शकतो. यासाठी म्युच्युअल फंड्स ऑपरेट करणाऱ्या काही संस्थांची नावे दिली आहेत. या संस्था गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसंदर्भात सेवा देत असतात.

१. आदित्य बिर्ला सनलाईफ२. ॲक्सिस (बँक) फंड३. बँक ऑफ बडोदा (बडोदा बीएनपी पारिबास)४. बँक ऑफ इंडिया फंड५. कॅनरा रूबेको ६.  फ्रँकलिन इंडिया७. कोटक बँक८. आयसीआयसीआय ९. एलआयसी१०. निप्पोन इंडिया११. मिरायी असेट१२. क्वान्ट फंड१३. मोतीलाल ओसवाल१४. स्टेट बँक ऑफ इंडिया१५. टाटा म्युचुअल फंड

Mutual Funds मध्ये गुंतवणूक किती कालावधीसाठी करायची?... समजून घ्या सोपा फंडा

या व्यतिरिक्त इतर संस्थाही आहेत. गुंतवणूक करताना निवडलेले फंड्स आणि त्याची मागील काही वर्षांची कामगिरी कशी राहिली आहे याचा अभ्यास गुंतवणूक करण्यापूर्वी अवश्य करा. हा अभ्यास नेमका कसा करावा याबाबत नंतरच्या लेखांत सविस्तर जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड्सचे प्रकार..

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्समध्ये रक्कम गुंतविण्यासाठी विविध प्रकार उपलब्ध आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेऊ.

१. इक्वीटी फंड - यात गुंतविलेले रक्कम शेअर बाजारात गुंतविली जाते. या फंड मध्ये विविध उप प्रकार आहेत. ते सविस्तर पुढे आपण जाणून घेणार आहोतच. यातील गुंतवणुकीचे रिटर्न्स बाजारातील चढ उतारावर निर्धारित असतात. म्हणून यातील गुंतवणूक जोखमीची बाब आहे असे म्हटले जाते. परंतु हाय रिस्क हाय प्रॉफिट यानुसार या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता अधिक राहते. 

२. डेट (Debt) फंड - यात गुंतविलेले पैसे हे शासकीय आणि कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये गुंतविले जातात. यात जोखीम कमी असते. यामुळे यातील रिटर्न्ससुद्धा मर्यादित स्वरूपात असतात.

३. हायब्रीड फंड - यात गुंतविलेले पैसे इक्विटी आणि डेट फंड्समध्ये गुंतविले जातात. यामुळे फक्त इक्विटीची १०० टक्के जोखीम कमी होते. उदाहरण म्हणून ५० टक्के इक्विटी आणि ५० टक्के डेट फंड हा ऑप्शन निवडला तर रुपये एक हजार गुंतविल्यास त्यातील रुपये ५०० इक्विटी फंड मध्ये आणि उर्वरित रुपये ५०० डेट फंड मध्ये जातात.

४. सोल्युशन ओरिएंटेड फंड - विशिष्ट उद्देश नजरेसमोर ठेऊन केलेली म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सोल्युशन ओरिएंटेड या प्रकारात मोडते. यामध्ये रिटायरमेंट सोल्युशन, रिटायरमेंट कॉर्पस फंड, पेन्शन फंड असे विविध प्रकारचे उद्देश ठरवून गुंतवणूक केली जाते. या फंडचा कालावधी दीर्घ असतो.

५. इतर फंड - यात ईटीएफ फंड, लिक्विड फंडचा समावेश असतो.

पुढील भागात जाणून घेऊ इक्विटी फंडचे विविध प्रकार.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार