Join us  

ऐतिहासिक : देशाचा Mutual Fund उद्योग पहिल्यांदा ₹५० लाख कोटींपार, SIP नं केली कमाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:24 AM

गेल्या काही काळापासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

देशाच्या आर्थिक विकासामध्ये आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. २०२३ मध्ये, देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ही पहिलीच वेळ आहे की उद्योगाच्या एयुएमनं ₹५० लाख कोटींचा आकडा पार केलाय. गेल्या १० वर्षांवर नजर टाकली तर उद्योगाची एयुएम सहा पटीनं वाढली आहे. २०१३ मध्ये उद्योगाची एकूण एयुएम ८.२५ लाख कोटी रुपये होती, जी २०२३ च्या अखेरीस ५० लाख कोटींहून अधिक झाली. हा डेटा उद्योगातील सर्वोच्च संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं (AMFI) जाहीर केला आहे.

पाच वर्षांत गुंतवणूकदार दुप्पटएम्फीचे अध्यक्ष नवनीत मुनेट यांनी सोमवारी उद्योगाची आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले की, डिसेंबर २०२३ मध्ये देशातील म्युच्युअल फंड उद्योगाचा आकडा ५० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो ऐतिहासिक आहे. कोरोनानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि देशातील गुंतवणूक वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सातत्यानं प्रयत्न केले. त्यामुळे अनेकांनी पहिल्यांदाच म्युच्युअल फंडातून गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या दुपटीने वाढली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ही संख्या १.९१ कोटी होती, जी डिसेंबर २०२३ मध्ये वाढून ४.२१ कोटी झाली आहे.

... ते एका वर्षात झालंउद्योगाच्या यशाबद्दल आपलं मत व्यक्त करताना, एम्फीचे मुख्य कार्यकारी वेंकट चालसानी म्हणाले, “म्युच्युअल फंड उद्योगाला एयूएमचे पहिले ₹१० लाख कोटी साध्य करण्यासाठी जवळपास ५० वर्षे लागली असताना, शेवटचे ₹१० लाख कोटी फक्त एक वर्ष लागलं. एका वर्षात ₹४० लाख कोटींवरून  ₹५० लाख कोटी रुपयांची कमाई झाली. यासाठी, एएमसी आणि नियामकांसह भारतातील संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगानं म्युच्युअल फंड वितरकांच्या पाठिंब्यानं देशभरातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :गुंतवणूक