Health Insurance : दिवसेंदिवस महाग होत असलेला वैद्यकीय खर्च पाहात आज प्रत्येक कुटुंबाकडे आरोग्य विमा असणे काळाजी गरज झाली आहे. साधा सर्दी, खोकला जरी आला तरी डॉक्टरांकडे गेलं तर हजार रुपये कुठे जातात कळतही नाही? अशा परिस्थितीत अवघ्या १२ ते २५ हजार रुपयांमध्ये तुम्हाला वर्षभर किमान ५ लाख रुपयांचे विमा सरंक्षण मिळू शकते. दुसरीकडे विमा निवडताना अनेकांची गफलत होते. कारण, बाजारात असंख्य विमा कंपन्या आहेत. यात आपल्या कुटुंबासाठी योग्य कोणता? हे निवडताना कठीण होते. तुमचाही असाच गोंधळ होत असेल तर आम्ही सांगतो, ते ५ मुद्दे लक्षात ठेवा.
तुमच्या गरजा समजून घ्या:
- तुमचे वय, आरोग्य आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य विचारात घ्या. कोणाला काही आजार, समस्या असेल तर त्याचाही विचार विमा घेताना करायला हवा.
- तुमच्या कुटुंबाला कोणत्या प्रकारच्या आरोग्य सेवांची आवश्यकता आहे, हे माहीत असणे आवश्यक आहे. उदा. काहींना रक्तदाबाचा त्रास असेल.
- तुमच्या बजेटनुसार विमा संरक्षण घ्या.
योग्य कव्हरेज निवडा:
- रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, शस्त्रक्रिया खर्च, औषध खर्च आणि इतर वैद्यकीय खर्च कव्हर करणारी योजना निवडा.
- काही कंपन्या काही गंभीर आजारांसाठी कव्हरेज देत नाही. आपल्या विम्यात असे आजार समाविष्ट असतील याची खात्री करुन घ्या.
- तुम्ही निवडलेल्या योजनेत डेकेअर प्रक्रिया, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा खर्च कव्हर होतो का? हे तपासा.
- आजकाल वैद्यकीय खर्च खूप जास्त आहे, त्यामुळे पुरेशा रकमेचे विमा संरक्षण असलेली योजना निवडणे आवश्यक आहे.
विमा कंपनीची निवड:
- विमा कंपनीचा दावा निकाली काढण्याचा दर चांगला असावा, जेणेकरून गरज पडल्यास तुम्हाला वेळेवर मदत मिळू शकेल.
- आपण घेत असलेल्या विमा कंपनीचे हॉस्पिटल नेटवर्क आपल्या परिसरात आहे का? हे विचारुन घ्या. विमा कंपनीची ग्राहक सेवा चांगली असावी. अनेकदा कंपनीचे हेल्पलाईन नंबर लागत नाही, त्यामुळे ऐनवेळी अडचण निर्माम येऊ शकते.
योजनेचे नियम आणि अटी वाचा:
- विमा योजनांमध्ये काही आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी असतो, त्यामुळे कमी प्रतीक्षा कालावधी असलेली योजना निवडणे चांगले.
- योजनेत कोणते आजार आणि उपचार कव्हर होतात आणि कोणते होत नाहीत, हे माहिती करुन घ्या.
- योजनेचा प्रीमियम किती येईल? तो तुम्हाला झेपेल का? प्रीमियम तुम्हाला एकरकमी भरावा लागेल की? हप्त्याने भरू शकता? हे विचारुन घ्या.
विमा योजनांची तुलना करा:
- विविध विमा कंपन्यांच्या योजनांची तुलना करा. सध्या बाजारात पॉलिसीबाजार सारख्या काही वेबसाईट्स आहेत. जे तुम्हाला विविध विमा कंपन्याच्या ऑफर्सची तुलना करुन देतात.