Join us  

PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:00 AM

३१ मे पर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घ्या.

ज्यांनी अद्याप त्यांचा पॅन नंबर (PAN) आधार कार्डाशी जोडला नाही त्यांच्यासाठी, स्रोतावर कापला जाणारा कर म्हणजेच टीडीएस (TDS) दर सामान्यपेक्षा दुप्पट असेल. हे नुकसान टाळण्यासाठी पॅनला आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. ३१ मे पूर्वी हे काम पूर्ण करण्याची संधी आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार जर करदात्यांनी ३१ मे पर्यंत त्यांचं पॅन आधार कार्डाशी लिंक केलं तर टीडीएस कमी करण्यासाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही. आयकर नियमांनुसार, पॅन बायोमेट्रिक आधारशी लिंक नसल्यास, लागू दराच्या दुप्पट दरानं कपात केली जाईल. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) यासंदर्भात एक परिपत्रक काढलंय. 'करदात्यांकडून अनेक तक्रारी मिळाल्या झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांना नोटिसा मिळाल्याचं सांगण्यात आलं.  

३१ मे पर्यंत अंतिम मुदत 

यासंदर्भात केलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी सीबीडीटीनं म्हटलंय की ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्यात आलेल्या व्यवहारांच्या संबंधी ३१ मे २०२४ किंवा त्यापूर्वी पॅन अॅक्टिव्हेट झालं (आधार लिंक केल्यानंतर), तर कमी टीडीएस कापल्या प्रकरणी कारवाई केली जाणार नाही. ज्यांचे पॅन आधारसोबत लिंक नसल्यानं डिअॅक्टिव्हेट झालेत, अशा करदात्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल. अशा लोकांनी लवकरात लवकर आधार पॅन लिंक करून घ्यावं, अशी प्रतिक्रिया एकेएम ग्लोबलचे भागीदार (टॅक्स) संदीप सहगल यांनी दिली.  

अधिकृत आकडेवारीनुसार, २९ जानेवारी २०२४ पर्यंत किमान ११.४८ कोटी पॅन आधारशी जोडलेले नव्हते. लोकसभेत लेखी उत्तर देताना, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार १ जुलै २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत आधारशी पॅन लिंक करण्यास विलंब झाल्याबद्दल सरकारनं ६०१.९७ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

टॅग्स :आधार कार्डपॅन कार्ड