Join us  

Income Tax Return : नवीन आयकर रिटर्न फॉर्म, भरण्यापूर्वी त्यातील बदल नक्की जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:40 AM

आयकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात नवीन आयकर रिटर्न फॉर्म जारी केले आहेत.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आयकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात नवीन आयकर रिटर्न फॉर्म जारी केले आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे? कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आयकर विभाग दरवर्षी वित्त कायदा व इतर संबंधित कायद्यात झालेले बदल आणि सुधारणा यांच्यावर आधारित नवीन आयटीआर फॉर्म जारी करत असतो. नवीन आयटीआर फॉर्म हा मागील वर्षाच्या तुलनेत किती, कसा वेगळा आहे याची माहिती प्रत्येक करदात्याने घ्यायला हवी.अर्जुन :  नव्या फॉर्ममध्ये कोणते  बदल केले आहेत?कृष्ण : १. नवीन आयटीआर फॉर्ममध्ये व्हर्च्युअल डिजिटल असेट (व्हीडीए) म्हणजेच क्रिप्टोकरन्सी, एनएफटी इत्यादी मालमत्तेसाठी नवीन तक्ता  आहे. नवीन तक्त्यामध्ये व्हीडीए संपादनाची तारीख, हस्तांतरणाची तारीख, संपादनाची किंमत, हस्तांतरणाची किंमत इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे. सरकारने व्हीडीएला ३० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे वरील बदल करण्यात आले आहेत.२. टीसीएसच्या तक्त्यामध्ये देखील एक नवीन बदल करण्यात आला आहे. ज्यात आयटीआर रिटर्न भरणाऱ्या व्यक्तीला ज्याने अशा टीसीएसचा क्लेम केला आहे, जो इतर व्यक्तीच्या खात्यात जमा झाला आहे अशा टीसीएसची माहिती देता येईल.३. व्यावसायिक करदात्यांसाठीच्या आयटीआर-०३ आणि आयटीआर-०४ मध्ये मागील आर्थिक वर्षात नवीन करप्रणालीमध्ये कर भरण्याचा पर्याय निवडला आहे का याची माहिती देण्यासाठी बदल केले आहेत.४. इंट्रा डे ट्रेडिंगची उलाढाल आणि त्यातून होणारे उत्पन्न याची माहिती स्वतंत्रपणे दाखविण्यासाठी आयटीआर फॉर्ममध्ये नवीन बदल केले आहेत. डिमॅट अकाउंटद्वारे इंट्रा डे ट्रेडिंग करणाऱ्या करदात्यांना  त्यांच्या इंट्रा डे म्हणजेच एकाच दिवशी शेअर्स खरेदी आणि विक्रीसंबंधित माहिती द्यावी लागेल.५. ज्या करदात्यांवर सर्च व सर्व्हे इत्यादींची कारवाई चालू आहे आणि ज्यांना कारवाईला प्रतिसाद म्हणून रिटर्न भरायचे आहे अशा करदात्यांसाठी आयटीआर फॉर्ममध्ये एक नवीन पर्याय आणला आहे; ज्यात ते त्यांचा प्रतिसाद रिटर्नच्या माध्यमातून भरू शकतात. करदात्यांनी या बदलांबाबत संपूर्ण माहिती आधीच जाणून घेतली पाहिजे.

टॅग्स :इन्कम टॅक्ससरकार