Join us

Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:24 AM

Income Tax New Service : नव्या सुविधेचा लाखो लोकांना होणार फायदा. करदात्याच्या आर्थिक व्यवहारांच्या तपशीलात पारदर्शकता येईल, असा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागानं अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटशी (AIS) जोडलेली नवी सुविधा सुरू केली आहे. यामुळे करदात्याच्या आर्थिक व्यवहारांच्या तपशीलात पारदर्शकता येईल, असा विभागाचा दावा आहे. यामाध्यमातून करदात्यांना कोणत्याही व्यवहाराबाबत आपलं स्पष्टीकरण किंवा अभिप्राय देता येणार आहे. याला फिडबॅक मेकॅनिज्म असं नाव देण्यात आलंय. हे आयकर दात्यासाठी फायदेशीर आहे. एआयएस म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये करदात्याच्या अशा सर्व व्यवहारांची माहिती असते, ज्यावर कर दायित्वं तयार केली जाऊ शकतात. 

इन्कम टॅक्स विभाग विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट तयार करतो. आतापर्यंत करदात्याला त्याच्या व्यवहारांचा तपशील पाहता येत होता. पण मी त्यावर प्रतिक्रिया देता येत नव्हती. आता नव्या प्रणालीनुसार करदात्याला त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्याही व्यवहारात काही विसंगती आढळल्यास तो त्याविषयी आपल्या सूचना करू शकतो. 

चुका कशा दुरुस्त कराल 

त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर करदाते व्यवहाराची स्थिती पाहू शकतात. त्याचा प्रतिसाद आर्थिक व्यवहार करणाऱ्या स्त्रोताकडे जाईल. तो स्त्रोत तुम्ही दिलेल्या माहितीवर कार्यवाही करेल. तो अंशतः किंवा पूर्णपणे स्वीकारूही शकतो. तो तुमच्या सूचना नाकारूही शकतो. जर त्याने ती पूर्णपणे स्वीकारली तर तो आपली माहिती दुरुस्त करेल. त्यानंतर तो योग्य तपशील आयकर विभागाला पाठवेल. अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये याची दुरुस्ती केली जाईल. 

पारदर्शकता वाढेल 

करदात्याला आपलं उत्तर सादर केल्यानंतर आपले अभिप्राय माहितीच्या स्रोतावर पाठविण्यात आले आहेत की नाही हे या सुविधेद्वारे पाहता येणार आहे. कमेंट कोणत्या तारखेला शेअर करण्यात आली आहे, हे ही त्याला कळेल. त्यावर समोरून कोणत्या तारखेला आपली प्रतिक्रिया दिली आहे, हेही कळेल. या सुविधेमुळे अधिक पारदर्शकता येणार आहे. 

वापर करण्याची प्रक्रिया 

या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कम्प्लायन्स पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. आयडी आणि पासवर्डसह लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देण्याच्या सुविधेचा वापर करुन टिप्पणी करणं आवश्यक आहे. 

टॅग्स :इन्कम टॅक्स