Join us

ITR Filing Rules: बदलले नियम! ३१ जुलैपर्यंत ITR फाईल करू शकला नाहीत तर, काय होतील परिणाम? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:47 AM

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. तुम्ही अजून ITR भरला नसेल, तर ते काम लवकर करा.

ITR Filing Rules: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. तुम्ही अजून आयटीआर (ITR Filing Rules) भरला नसेल, तर ते काम लवकर करा. अन्यथा तुम्हाला त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. रिटर्न वेळेवर भरणं अतिशय चांगलं. परंतु जर तुम्ही मुदतीनंतर आयकर रिटर्न भरला तर तुम्हाला बिलेटेड रिटर्न भरावा लागेल. ज्यासाठी तुम्हाला आयकर विभागाकडून एक ठराविक वेळदेखील दिली जाते. मात्र यासोबतच तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.

किती असेल दंड?सर्वप्रथम, जर आपण दंडाबद्दल सांगायचं झालं तर, जर तुमचं उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचं उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर दंडाची रक्कम पाच हजार रुपये होईल. यासोबतच तुम्हाला अनेक वजावट आणि सवलतींचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कराचा बोजा वाढेल. म्हणजे यातही तुमचं जास्त नुकसान होईल.बिलेटेड रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंतचा कालावधी आयकर विभागानं दिला आहे. त्यानंतरही तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाही, तर तुमच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्यामुळे आयकर सवलत आणि कपातीचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपूर्वी रिटर्न भरणं कधीही चांगलं.

दंडासह द्यावं लागेल व्याजजर तुमच्या उत्पन्नावर टॅक्स लागत असेल आणि तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न करू शकत नसाल, तर तुम्ही रिटर्न फाइल करेपर्यंत दर महिन्याला १ टक्के दरानं व्याज भरावं लागेल. आयकर भरताना तुम्ही तुमचं उत्पन्न कमी घोषित केल्यास ५० टक्के आणि  तुमच्या उत्पन्नाची चुकीची माहिती दिल्याबद्दल २०० टक्के दंड भरावा लागेल. वारंवार नोटीस देऊनही आयकर भरला नाही, तर अशा प्रकरणात तीन वर्ष ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

जर कर्मचारी टॅक्स रिटर्न भरण्यात अयशस्वी झाले तर त्यांना नवीन कर प्रणालीचा लाभ मिळणार नाही. नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आलं होतं. उशीरा रिटर्न भरण्याचा एक मोठा तोटा म्हणजे तुम्हाला टॅक्स रिफंड मिळण्यातही असुविधा होऊ शकते. यासोबतच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. ज्यामुळे तुम्ही चौकशी किंवा तुम्ही चौकशीच्या कक्षेत येऊ शकता.

टॅग्स :इन्कम टॅक्स