Join us  

३५ लाख टॅक्स पेयर्स अद्यापही रिफंडच्या प्रतीक्षेत, पाहा आयकर विभागानं काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:51 PM

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही आतापर्यंत लाखो लोक रिफंडच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आलीये.

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही आतापर्यंत लाखो लोक रिफंडच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आलीये. ९ ऑक्टोबरपर्यंत करदात्यांना १.५० लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. तर ३५ लाखांहून अधिक करदाते अजूनही टॅक्स रिफंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार ७.०९ कोटीहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, २०२३-२४ च्या असेसमेंट इयरसाठी सप्टेंबरपर्यंत ७.०९ कोटीहून अधिक कर रिटर्न भरले गेले आहेत. यापैकी, ६.९६ कोटींपेक्षा जास्त आयटीआर व्हेरिफाय करण्यात आलेत. त्यापैकी ६.४६ कोटींपेक्षा जास्त रिटर्न आतापर्यंत प्रोसेस करण्यात आलेत. ज्यामध्ये बहुतांश करदात्यांना रिफंड जारी करण्यात आलाय.१० ऑक्टोबर रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं डेटा जारी केला. १ एप्रिल २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १.५० लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिटर्न जारी करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही ३५ लाख करदाते आहेत ज्यांना कर परतावा मिळालेला नाही असं त्यांनी नमूद केलं.

काय म्हटलंय आयकर विभागानं?आयकर विभागाने अशा करदात्यांना त्याची माहिती दिली आहे. जर त्यांचे तपशील अपूर्ण असतील किंवा रिटर्नचे तपशील बरोबर नसतील तर त्यांना ईमेल आणि मेसेजद्वारे माहिती पाठवण्यात आली आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, असे अनेक करदाते आहेत ज्यांनी मेल किंवा मेसेजला उत्तर दिलेलं नाही. अशा करदात्यांनी त्याचं उत्तर शक्य तितक्या लवकर पाठवावं जेणेकरुन त्यांचे रिटर्न्स सुधारणेनंतर जारी केले जाऊ शकतील, असंही त्यांनी म्हटलंय.

टॅग्स :इन्कम टॅक्स