जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची स्वप्ने बघणाऱ्या भारतीयांनी एक मैलाचा दगड पार केला आहे. पाचव्या क्रमांकावरून भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे. निती आयोगाच्या अध्यक्षांनी याची घोषणा केली असून भारताने चौथ्या क्रमांकावर असलेल्या जपानला मागे टाकल्याचे म्हटले आहे.
जग मंदीशी, व्यापार युद्धाशी झुंजत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बाब मानली जात आहे. नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांच्यानुसार भारताने अधिकृतपणे जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत. आज भारत जपानपेक्षा मोठा झाला आहे. फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा मोठे आहेत. आपण जे नियोजन केले आहे आणि जे विचारात घेतले जात आहे त्यावर टिकून राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वास सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला. यावेळी सुब्रह्मण्यम यांनी आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला दिला.
डोनाल्ड ट्रम्प आणि अॅपलच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. अमेरिका शुल्क काय लावेल हे अनिश्चित आहे. परंतू, आम्ही कंपन्यांसाठी उत्पादन करण्याच्या दृष्टीने स्वस्त जागा असणार आहोत, असे ते म्हणाले. मालमत्ता मुद्रीकरण पाइपलाइनचा दुसरा टप्पा तयार केला जात आहे आणि ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.
४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती...४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती असा प्रश्न सर्वांना पडला असणार, म्हणजे 4,000 अरब डॉलर. म्हणजेच भारतीय रुपयांत 400,000 कोटी एवढे होतात.