Join us  

‘या’ बँकेनं ठेवींवर वाढवले व्याजदर, 'बँक ऑफ बडोदा'नंही सुरू केल्या विशेष ठेव योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:46 AM

बँकेने 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या ठेवींवर सर्वाधिक वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केली. त्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे काही बँकांनी आपल्या ठेवींवर अधिक व्याजदर देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 0.3 टक्क्यांवरून 1.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँकेने 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या ठेवींवर सर्वाधिक 7.5 टक्के वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त दर आता 0.50 टक्क्यांवरून 0.75 टक्के करण्यात आला आहे.

बँक ऑफ बडोदा (BoB) ने देशांतर्गत किरकोळ मुदत ठेवींवर 6 टक्क्यांपर्यंत व्याजदर देणारी नवीन ठेव योजना सुरू केली आहे.'बडोदा तिरंगा डिपॉझिट स्कीम' भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू करण्यात आली आहे. उच्च व्याजदर देणारी ही एक विशेष मुदत ठेव योजना असल्याचे बँक ऑफ बडोदाने निवेदनामध्ये म्हटले आहे.

ही योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध असेल. या योजनेत अनुक्रमे 5.75 टक्के आणि 6 टक्के वार्षिक व्याजदरासह 444 आणि 555 दिवसांच्या दोन मॅच्युरिटी आहेत. ही योजना 16 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींवर लागू आहे. योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर अतिरिक्त व्याज मिळणार असल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :गुंतवणूकबँकज्येष्ठ नागरिक