भारतीय संस्कृती परंपरांमध्ये ३३ कोटी देवतांची संकल्पना रूढ आहे.
भारतीय संस्कृतीत काही मान्यता शतकानुशतके पुढील पिढीपर्यंत जात असतात.
भारतात हजारो मंदिरे आढळून येतात. श्रद्धेनुसार आपल्या आराध्याचे पूजन, नामस्मरण केले जाते.
वर्षभरात विविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जात असतात. यामध्ये देवता, त्यांचे अवतार यांचे पूजन केले जाते.
अनेक ठिकाणी पंचमहाभूतांचेही पूजन केले जाते. भारतात गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे. कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते.
गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते.
खरेच ३३ कोटी देवता आहे का? ३३ कोटी देवतांची नावे काय? ३३ कोटी देवता, महत्त्व, मान्यता आणि काही तथ्ये यांविषयी जाणून घेऊया...
भारतीय संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पंचदेवता मानल्या गेल्या आहेत.
गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे. काही ठिकाणी सूर्याचा या पंचदेवतांमध्ये समावेश करण्यात येतो.
३३ कोटी देवता संख्या नाही, संकल्पना आहे. संस्कृत भाषेत 'कोटी' या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे.
त्यामुळे आपल्याकडे ३३ कोटी ही देवतांची संख्या नसून, त्याचे प्रकार आहेत. या ३३ कोटी देवतांचा उल्लेख काही प्राचीन ग्रथांमध्ये आढळून येतो.
३३ कोटी देवतांकडे या संपूर्ण सृष्टिचे व्यवस्थापन असल्याची मान्यता आहे. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती आहेत.
या प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे. प्रत्येकाचा कार्यभार वेगळा असल्यामुळे याला कोटी म्हटले गेले आहे. कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे.
बारा आदित्यांची नावे : अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.
अकरा रुद्रांची नावे : मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
अष्टवसूंची नावे : आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास. एक इंद्र. एक प्रजापती. असे एकूण: ८+११+१२+१+१ = ३३.
सदर माहिती सामान्य गृहीतके, मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.