Join us

उत्तरेतील थंड वाऱ्यांचा वेग ओसरला, महाराष्ट्रात कसे राहणार हवामान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 03, 2024 9:29 AM

हवामान विभागाने दिला अंदाज, जाणून घ्या..

देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंड वाऱ्यांचा जोर ओसरला आहे. परिणामी राज्यातली थंडी पुढील काही दिवस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती ०.९ किमी अंतरावर असल्याचे हवामान  विभागाने सांगितले.

उत्तरेतील अनेक राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आल्याने थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता कमीच

राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात कोरड्या हवामानामुळे प्रचंड गारठा आणि थंडी वाढली होती. उत्तरेतील मैदानी भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्याने येत्या पाच दिवसात गारठा वाढण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात असे राहणार तापमान

संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे चालु फेब्रुवारी महिन्यात थंडीचे प्रमाणही दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमी जाणवेल. कोकण व उत्तर महाराष्ट्र वगळता दुपारचे कमाल तापमान ह्या महिन्यात सरासरी इतके तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक राहील. म्हणजे दिवसाचा ऊबदारपणा नेहमीसारखाच जाणवेल असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवले. 

मराठवाड्यात पुढील पाच दिवस..

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :हवामानतापमान