Join us

पैठण शहरात गूढ आवाज; ८ वर्षांतील ३१ वा हादरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 5:00 PM

वर्षभराच्या कालावधीनंतर शहरातील दक्षिण भाग व परिसरात शुक्रवारी दुपारी १:४७ वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. ८ वर्षातील हा ३१ ...

वर्षभराच्या कालावधीनंतर शहरातील दक्षिण भाग व परिसरात शुक्रवारी दुपारी १:४७ वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. ८ वर्षातील हा ३१ वा हादरा आहे.

पैठण शहरात यापूर्वी १ ऑक्टोबर, २०१२ रोजी जमिनीतून गूढ आवाज आला होता. त्यानंतर शुक्रवारी ५ किलोमीटर परिघ परिसर गूढ आवाजाने हादरला. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकीच्या काचा कंप पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली. त्यामुळे नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती. विशेष म्हणजे, पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यानच असे हादरे बसले आहेत. नोहेंबर महिन्यात गूढ आवाजाचा हादरा बसण्याची ही पहिली वेळ आहे. भूकंपमापन यंत्रावर नोंद होत नसलेल्या या गूढ आवाजासमोर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानेही हात टेकले आहेत. नेमका हा आवाज येतो कोठून हा यक्षप्रश्न जनतेला भेडसावत आहे.

जगभरात सातत्याने होणाऱ्या भूकंपाचे प्रमाण वाढते आहे. नुकताच दिल्ली- एनसीआर भागात भूगर्भातून आवाज आले. तसेच काही भागांमध्ये घरे पडल्याचेही सांगण्यात आले. 

मागील ३० दिवसांमध्ये २३६ वेळा भूकंप

मागील ३० दिवसांमध्ये भारतात भूकंप झाल्याचे नोंदवण्यात आले आहेत.मागील ७ दिवसात झारखंड तसेच अंदमान निकोबार आंध्र प्रदेश, असाम, दिल्ली अशा अनेक राज्यात भूकंपाचे हादरे बसले आहेत.

नुकतेच १५ नोव्हेंबर रोजी पहाटे 5.35 वाजता पाकिस्तानात जोरदार भूकंप झाला होता, त्यामुळे लोक घाबरले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 होती, ज्याचे धक्के लोकांना काही सेकंदांसाठी जाणवले. याआधी मंगळवारी श्रीलंकेतील कोलंबामध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

टॅग्स :भूकंपपैठणदिल्ली