Join us

विठ्ठल सावंत यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने वाढविला डाळिंबाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 12:51 PM

निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे.

चंद्रकांत गायकवाडनिवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे. सावंत पती-पत्नी, त्यांची दोन मुले, सुना, चार नातवंडे असे मिळून दहा जणांच्या एकत्रित कुटुंबाचा राबता असल्याने ही किमया सत्यात उतरली आहे.

या कुटुंबाने २०१२ मध्ये माढूपटी नावाचे एक एकर बरड, मुरमाड जमिनीत भगवा जातीची ३३० झाडे चौदा बाय पंधरा अंतरावर लावली. पहिली दोन वर्षे जुजबी उत्पन्न मिळाले. नंतरच्या उत्पन्नातून विहीर खोदाई, ठिबक संच बसविणे,फवारणी सयंत्र खरेदी अशी पूरक कामे होऊन घरखर्चाला हातभार लागला.

यावर्षी हे तेरावे डाळिंब पीक आहे, असे यमाजी सावंत यांनी सांगितले. बेडवरील आंतरमशागत कुदळ, दाताळ वापरून मानवी बळाने केली जाते. झाडांच्या दुहेरी बाजूने खड्डे घेत शेणखताच्या जोडीने काहीअंशी रासायनिक खते टाकून खड्डे बुजविली जातात. बेडचा ओलावा टिकावा. उन्हाळ्याची धग कमी लागावी म्हणनू उसाचे पाचट, बनग्या टाकाऊ वस्तूंचे आच्छादन केले जाते. यामुळे फळांवर बुरशीजन्य रोग कमी येत असल्याचा अनुभव आहे.

गूळ, ताक, गोमूत्र, बेसन पीठ, पेंड स्लरी विद्राव्य पद्धतीने दिली जाते. त्यामुळे जीवाणूंची वाढ होऊन फळांना चमक येते, असा खुलासा नामदेव व अर्चना सावंत यांनी केला.

प्रति झाडास सत्तर ते ऐंशी किलो डाळिंबप्रति झाडास सत्तर ते ऐंशी किलो डाळिंबाची फळे निघत असून जागेवरच व्यापाऱ्याने १२० रुपये दराने यावर्षी या बागेची खरेदी केली असल्याचे वास्तव चित्र समोर आले. चमकदार फळांचे दहा किलो वजन मोजून खोकी पॅकिंग करून हा माल दिल्ली, आग्रा अशा मोठ्या शहरांत विक्रीसाठी जात आहे. अर्थप्राप्ती होत असल्याने सावंत यांच्या एकत्रित कुटुंबाचा गोडवा अधिकच वृद्धिंगत होत आहे.

टॅग्स :डाळिंबपाथर्डीशेतकरीसेंद्रिय खतसेंद्रिय शेतीखतेठिबक सिंचनऊस