Join us

राखीतून होईल बीजारोपण! 'स्वाधार' च्या विशेष मुलींनी बनवल्या बियांपासून १५०० राख्या   

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 30, 2023 7:50 PM

वर्ग सुरु असतो. पाच मुलींना गोलाकार बसता येईल अशी बाकांची रचना. पण बाकांवर गेल्या तीन महिन्यांपासून बीया, दोऱ्या, डिंक, ...

वर्ग सुरु असतो. पाच मुलींना गोलाकार बसता येईल अशी बाकांची रचना. पण बाकांवर गेल्या तीन महिन्यांपासून बीया, दोऱ्या, डिंक, खपटाचे छोटे तुकडे असा सगळा ऐवज अस्ताव्यस्त अवस्थेत पहुडलेला. रानोमाळी, अंगणातल्या वेगवेगळ्या औषधी झाडांचा, आजूबाजूच्या झाडांच्या पडलेल्या बीया गोळा करून 'स्वाधार' गतिमंद मुलींच्या निवासी शाळेत राखीपौर्णिमेची लगबग सुरु झाली होती. या शाळेत विशेष क्षमता असणाऱ्या साधारण 30 मुलींनी यंदाच्या राखीपौर्णिमेला बीजांपासून १००० ते १५०० राख्या बनवल्या. 

निंबोणी, करंजी, भोपळा,चंदनअशा वेगवेगळ्या बीजांभोवती एखादा मणी, मोती चिटकवून सुंदर सजवलेल्या या राख्या धाराशिव मधील अनेक शाळा कॉलेजमध्ये पाठवल्या जातात. एक दिवस बांधलेली राखी दुसऱ्या दिवशी कुठेही पडली तरी या बियांमधलं एखादं बीज तरी उगवेल आणि तिथे झाड येईल.ही या सगळ्या प्रयोगामागची कल्पना. साध्या साध्या गोष्टींमधून आपल्या भोवतीचा जग सांगणारा हा प्रयोग या शाळेत सातत्याने राबवला जातो. 

"प्रत्येक मुलीची क्षमता वेगळी. तिच्या गतीने, हळूहळू तिच्या मनातला सौंदर्याला साजेशी ही राखी करायला तीन महिने आधीपासून तयारीला लागावं लागतं. शाळा निवासी असल्यामुळे अंगणात बऱ्याच प्रकारची झाडं, भुईमूग कोथिंबीर भेंडी अशी उपयुक्तता असणारी अनेक पिके घेतली जातात. खेळता खेळता 'चला आपण सगळे बीज गोळा करू.' इतक्या सहजतेने झाली सुरुवात.. " शाळेत कला शिकवणाऱ्या शिक्षिका नीता ढगे सांगत होत्या. 

सहा- सात मुलींचा एक गट अशा तीस मुलींनी यंदा बाराशे ते पंधराशे राख्या बनवल्याचे नीताताई सांगतात. राखी पौर्णिमा, गणपती, दिवाळी अशा सणांना राख्या, शाडू मातीचे गणपती, पणत्या बनवण्याचे प्रयोगही या मुलीकडून करून घेतले जातात. त्यांच्या कलात्मकतेलाही चालना मिळते.

मागील सात ते आठ वर्षांपासून या शाळेतल्या मुली तेवढ्याच उत्साहात झाडाच्या बियांच्या राख्या बनवतात. एका दिवसाचा सण असणाऱ्या राखीपौर्णिमेला रंगीबेरंगी मणी,मोती, खड्यांच्या राख्या घेत कोट्यावधींची उलाढाल होत असताना सणाची शेतीशी सांगड घालून नवा पायंडा पडला जात आहे. 

 

टॅग्स :रक्षाबंधनउस्मानाबादशेतीलागवड, मशागतराखी