Join us

लाल मिरचीचे देठ काढून देण्यात धर्माबादच्या महिलांना मिळतो रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:21 AM

दिवसभरात एक महिला कमवते चारशे रूपयाच्या वर

धर्माबाद  शहरातील लाल मिरची नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. तिखट लाल मिरचीसह येथे पावडर उपलब्ध आहे. त्यासोबतच मिरची देठ काढण्यासाठी दररोज शंभर ते दीडशे महिलांना रोजगार मिळत आहे. दिवसभरात एक महिला चारशे ते पाचशे रुपयांच्या वर कमाई करत आहे. ज्यांना काम मिळत नाही, अशा महिलांना झंवर वसाहतीमध्ये कामाचा आधार मिळत आहे.

धर्माबाद शहरातील रेल्वे गेट नंबर एकजवळ मिरची झंवर वसाहत आहे. या ठिकाणी तब्बल सोळा वर्षांपासून महिलांना रोजगार मिळतो. बाजारात आलेली लाल मिरची खरेदी करून झंवर वसाहतीत आणले जाते. त्यामुळे मिरचीचे देठ काढण्यासाठी महिलांना रोजगार मिळतो.

बारीक लाल मिरची प्रतिपंचवीस रुपयांप्रमाणे देठ काढले जातात. जाड लाल मिरची प्रतिपंधरा रुपये याप्रमाणे देठ काढले जातात. दिवसभरात एक महिला चारशे ते पाचशे रुपयांच्यावर काम करते. व्यापाऱ्यांकडून दररोज दिवसभरासाठी रोजची मजुरी म्हणून चारशे रुपये दिले जातात.

या वसाहतीत १५० ते २०० महिलांना रोजगार मिळतो. शहरातील मौलालीनगर, इंदिरानगर, शंकरगंज, रत्नाळी, फुलेनगर, शास्त्रीनगर, बाळापूर, रामनगर, रमाईनगर, साठेनगर या नगरांतून महिला येथे कामासाठी येतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महिला काम करतात.

देठ काढणाऱ्या महिलांना सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मागील सोळा वर्षापासून येथील महिलांना रोजगार मिळत असल्याने या भागातील नागरिकांचे स्थलांतर थांबले आहे. धर्माबादची राज्यात लाल मिरची विक्री केंद्र म्हणून ओळख झाली आहे.

बाजार समितीत मिरचीची आवक

दोन वर्षांपासून बाजार समितीत मिरचीची आवक झाली असल्याने येथील व्यापाऱ्यांना सोईस्कर झाले आहे. बाजारात मिरचीची आवक होत नाही तेव्हा तेलंगणा, आंध्र प्रदेशातील हैदराबाद, वरंगल, खमम, गुंटूर, बॅडगी या भागातून टु सेव्हन थ्री, एसटेन, सीएस, डीडी, सुवर्णा या नावाच्या मिरचीची धर्माबादेत आयात करत होते. पण, दोन वर्षांपासून बाजार समितीत मिरचीची आयात झाल्याने धर्माबादेतच मिरची खरेदी करतात.

सोळा वर्षापासून महिलांच्या हाताला काम

मिरची वसाहतमध्ये सोळा वर्षांपासून महिलांना रोजगार मिळत आहे. शेतात काम करू शकत नाही अशा महिला सावलीला काम करतात. त्यांच्या कामानुसार रोजगार मिळतो. दोन वर्षांपासून बाजारात मिरचीची आवक झाली आहे. येथूनच मिरची खरेदी करतो. आम्ही मिरचीचे देठ काढून राजस्थान, गुजरात व मुंबई आदी भागात पाठवितो. - रूपम झंवर, व्यापारी, धर्माबाद

हेही वाचा - काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ

टॅग्स :मिरचीनांदेडनांदेडशेती