Join us

देवगाव : मनरेगा अन् कृषी विभागाच्या योजनांचे सर्वांत जास्त लाभार्थी असणारं एकमेव गाव!

By दत्ता लवांडे | Published: February 03, 2024 4:39 PM

या गावातील ३०० पैकी ३०० कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : कृषी विभागात शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. यामधून अनेक गावे आपली प्रगती साधून घेतात तर काही गावापर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ मिळत नाही अथवा अंमलबजावणी होत नाही. पण सध्या महाराष्ट्रामध्ये असे एक गाव आहे, ज्या गावाने कृषी विभागाकडून आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजनांचा सर्वांत जास्त लाभ घेतलेला आहे. या गावात साधारण ३०० कुटुंबे असून यातील प्रत्येक कुटुंबाने योजनेचा लाभ घेतला असल्याचं देवगावचे सरपंच योगेश कोठुळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गावामध्ये २००० सालापासून गटशेतीला सुरूवात झाली आणि गावचं अर्थकारण बदलायला सुरूवात झाली. यातच शासकीय अनुदान आणि आर्थिक लाभाच्या योजना घेण्यास येथील शेतकऱ्यांनी सुरू केली. आज घडीला  गावातील सर्व शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ या गावामध्ये घेतलेला आहे. यामध्ये जनावरांचे गोठे, घरकुल, सौरउर्जा,  शेततळे, विहिरी, फळबाग लागवड, वनशेती योजना, ठिंबक सिंचन अनुदान, पाणंद रस्ते यासारख्या योजनांचा सामावेश आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना

  • रेशीम लागवड अनुदान योजना - एकरी ४ लाख अनुदान (१ लाख शेड आणि ३ लाख अकुशल कामासाठी)
  • मोहगणी वृक्ष लागवड योजना -    एकरी २ लाख ८५ हजार लाख अनुदान (७० हजार कुशल आणि २ लाख १५ हजार अकुशल कामासाठी)
  • वैयक्तिक जनावरांचे गोठे - ७७ हजार (५५ हजार कुशल आणि २२ हजार अकुशल कामासाठी)
  • वैयक्तिक सिंचन विहिरी - ४ लाख अनुदान (१ लाख ४० हजार बांधण्यासाठी आणि २ लाख ४० हजार खोदकामासाठी आणि २० टक्के आकस्मित खर्च) मागच्या ५ वर्षांमध्ये ५० ते ६० विहिरींना प्रशासकीय मान्यता. त्यातील ३२ विहिरी पूर्ण
  • गावातील १२० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नावनोंदणी केली आहे. हे काम मार्चमध्ये सुरू होईल.
  • घरकुल योजना

सार्वजनिक  लाभाच्या योजना

  • मातोश्री पाणंद रस्ते खडीकरण - २४ लाख रूपये निधी उपलब्ध (१२ लाख कुशल आणि १२ लाख अकुशल खर्च)
  • बांबू लागवड योजना प्रस्तावाला मान्यता - १ कोटी ४० लाख रूपयांच्या अनुदानाला मान्यता
  • गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते -  १ ते १.५ कोटी रूपयांचा निधी
  • ब्लॉक - मोकळ्या जागेसाठी ब्लॉक - ३ कोटी रूपयांचा निधी

मनरेगा अंतर्गत सर्व योजनांच्या कामाची आमच्या गावात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, कृषी विभाग आणि मनरेगा अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या वैयक्तिक लाभामध्ये आमचे गाव सध्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे. - योगेश कोठुळे (सरपंच, देवगाव ता. पैठण)

गावामध्ये साधारण ३०० कुटुंबे आहेत. त्यामध्ये घरकुल योजना, फळबाग लागवड, सिंचन विहिरी, शेततळे, जनावरांचे गोठे अशा वैयक्तिक आणि पाणंद रस्ते, सार्वजनिक योजनांचा लाभ येथील शेतकरी घेत आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा फायदा कसा होईल याचा विचार आम्ही करतो.- मदन बोंद्रे (ग्रामरोजगार सेवक, देवगाव ता. पैठण)

 

 

 

 

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी