Join us

Success Story : भंडारा जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा प्रयोग, तीन एकर फळबागायतीत भाजीपाल्याची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 2:37 PM

तंत्रशुद्ध नियोजनाने तीन एकर जागेत फळबाग व भाजीपाल्याची आंतरपीक शेती जोमात आली आहे.

भंडारा : इच्छाशक्तीच्या बळावर फळबागायतीत भाजीपाल्याची शेती फळाला आली. काश्मिरी बोरच्या मधात ढेमसच्या आंतरपिकाचे भरघोस उत्पन्न सुरू झाले आहे. ३३ आर न जागेतील पहिला तोडा ६३२ किलो एवढा निघाला. दरसुद्धा अपेक्षित मिळाल्याने नवजात बागायतदार महिला सरिता सुनील फुंडे शेतीत रमल्या आहेत. तंत्रशुद्ध नियोजनाने तीन एकर जागेत फळबाग व भाजीपाल्याची आंतरपीक शेती जोमात आली आहे.

सरिता फुंडे यांनी कृषी विभागाचा सल्ला घेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काश्मिरी बोरच्या शेतात ढेमस लावण्याचा निर्णय घेतला. याकरिता साकोलीतील कृषी पर्यवेक्षक भगीरथ सपाटे यांनी सहकार्य केले. काश्मिरी बोरच्या बांधानात ड्रिप मल्चिंगचा आधार घेत ढेमसची लागवड केली. आरंभाला २०-४० किलो एवढे ढेमस निघाले. ते स्थानिक बाजारपेठेत ४५ रुपये किलो दराने - विकले. हप्त्याभराचे अंतराने पहिलाच तोडा ६३२ किलोंचा मिळाला. ढेमस बीटीबी येथे विक्रीला पाठविण्यात आले. बंडू बारापात्रे यांनी ढेमसचा दर्जा ओळखून ४० रुपयांपासून दर सुरू केला. 

तीन एकर जागेत भाजीपाल्याच्या शेतीसह ढेमस, काकडी व वांगे पिकाचे नियोजन आहे. ढेमसचा तोडा सुरू झाला आहे. दोन ते तीन दिवसांत काकडीचा तोडा सुरू होईल. यावर कृषी पर्यवेक्षक भगीरथ सपाटे म्हणाले की, मजुरांच्या भरोशावर न राहता स्वतः नियोजन करून फळबाग व भाजीपाल्याची फुलविलेली बाग प्रेरणादायी आहे. इतरही शेतकरी त्यांच्या बागेत अभ्यासाकरिता येत आहेत. कृषी विभाग साकोलीच्या माध्यमातून अत्याधुनिक मार्गदर्शन सुरु आहे.

फळबाग आणि आंतरपीक सांगड जमली! 

तर शेतकरी सरिता फुंडे म्हणाल्या की, धान पिकाला पर्याय म्हणून फळबाग व त्यात आंतरपीक म्हणून भाजीपाल्याच्या शेतीला पसंती दिली. ४५ दिवसांत उत्पन्न मिळत आहे. पहिलेच वर्ष असल्याने कठीनाईचा सामना करावा लागला, दररोज १५ ते २० मजुरांना काम मिळत आहे. शिवाय या प्रयोगाने इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून एकाच क्षेत्रात दोन पीक घेणं शक्य असल्याचे यावरून दिसून येते. म्हणूनच यापुढे देखील शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याचा मानस असल्याचे फुंडे यांनी बोलून दाखवले. 

टॅग्स :शेतीभंडाराशेती क्षेत्र