'शिक्षण तर कमी, म्हणून मोलमजुरीशिवाय पर्याय नव्हता. पण मशरूम शेतीनं सर्वकाही बदललं. आमच्या कौलांच्या घरात असलेल्या किचनमध्ये दहा बेडपासून सुरवात केली आज सुसज्ज अशा शेडमध्ये ४०० हून अधिक मशरूमचे बेड तयार होत आहेत. या मशरूम शेतीनं माझं आयुष्य फुलवलंच शिवाय आमचा संसारही फुलवला आहे.'
केवळ नववी शिक्षण असणाऱ्या वैशाली मुरलीधर उदार यांची ही यशोगाथा. त्या मूळच्या भात हे मुख्य पीक असलेल्या त्र्यंबक तालुक्यातील. त्याचं माहेरही याच भात पट्ट्यातील मुरुमहट्टी हे गाव. २००५ ला लग्न होऊन त्या कोणे या गावी आल्या. सासरी देखील भात शेतीच. सासरचे अल्पभूधारक शेतकरी असल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असे. याच दरम्यान गावातील महिला बचत गटात त्यांनी सहभाग घेतला.
याच बचत गटाच्या माध्यमातून त्या कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे मशरूम शेती प्रशिक्षणासाठी गेल्या. हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. वैशाली यांच्यासह अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतले. पण कुणीच मशरूम शेतीसाठी धाडस दाखवलं नाही. पण वैशाली यांनी प्रशिक्षणांदरम्यान मिळालेल्या एक किलो बियाणातून दहा बेड तयार केले. स्वतंत्र अशी खोली नसल्याने त्यांनी ते घरातीलच किचनमध्ये ठेवले.
तयार केलेल्या दहा बेडला जवळपास सहा ते सात किलो मशरूम आले. आणि ते त्यांनी घराजवळून जात असलेल्या, नेहमीच वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर विकले. विशेष म्हणजे काही तासांतच मशरूम विक्री झाली. आणि त्यांना विश्वास आला की मशरूम शेतीच करायची. तेव्हापासूनचा प्रवास आजतागायत सुरू आहे. सुरवातीला दहा, नंतर २५, मग ८०, नंतर १५० असे करता करता आज त्या ४०० ते ४५० चारशे बेड तयार करत आहेत.
शेतीला जोड व्यवसायाचा पर्यायजवळपास पाच वर्षांपासून त्या मशरूम शेती यशस्वीरित्या करीत आहेत. शिक्षण केवळ नववीपर्यंत, पण एक संधी भेटली, त्या संधीच सोनं केलं. आज मुंबईपासून दिल्लीपर्यंत, महाराष्ट्रापासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत असा अनोखा प्रवास मशरूम शेतीमुळे पाहायला मिळाला. मुलींच्या शिक्षणापासून ते घर संसार चालवण्यासाठी मशरूम शेती आधार ठरत आहे. शिवाय शेतीला जोड व्यवसायाचा पर्याय हवा असेल, तर 'मशरूम शेती' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
मोलमजुरी पेक्षा मशरूम शेती चांगलीआज अनेक महिला २५० ते ३०० रुपये रोजाने मजुरीसाठी जात असतात. या महिलांनी मशरूम शेती करून कुटुंबाला हातभार लावावा. याला शिक्षण असलच पाहिजे, अस काही नाही. मी केलं तर तुम्हीही करू शकता. माझ्यासारख्या महिलाना स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी मशरूम शेती फायदेशीर असा व्यवसाय असल्याचे उदार यांनी सांगितले.
मशरूम शेतीच गणितमशरूम शेतीसाठी प्रामुख्याने सोयाबीन, भात, गव्हाचा भुसा वापरला जातो. हा भुसा सुरवातीला काही तास भिजवून पुन्हा उकळवला जातो. त्यानंतर सुकवावा लागतो. सुकवल्यानंतर बेड भरले जातात. यामध्ये आधी भुसा नंतर मशरूमच्या बियाणे भरले जातात. साधारण वीस दिवसानंतर मशरूम काढणीला येत असतात. पूर्ण बॅच काढल्यानंतर या भुशाचे गांडूळखत तयार केले जाते.