Join us

दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी 

By गोकुळ पवार | Published: February 16, 2024 6:28 PM

अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर अंध असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं.

"लहानपणापासून शेतीची आवड आहे... शेतीत पैसा कमी पण पैशांपेक्षा शेतीची लय आवड, शेतीचा टापटीपपणाची आवड आहे, म्हणून ही आवड जोपासतोय. साहेब, अंध असलो म्हणून काय झालं? आज कुणीही कोणत्याही क्षेत्रात सगळ्यात वरच्या स्थानावर जाऊ शकतं, यश मिळवू शकतं." म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज मला डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर दिव्यदृष्टी (अंध) असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं." 

आज दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणतही ध्येय सहज साध्य करु शकतो, याची अनेक उदाहरणं देता येतील. पण धुमाळ कुटुंबीय दुर्मिळच. धुमाळ कुटुंबीय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दावचवाडी या गावचे. नाशिक जिल्हा म्हटला सर्वदूर द्राक्षांची शेती पाहायला मिळते. लहानापासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत द्राक्षांची शेती केली जाते. मात्र धुमाळ कुटुंबियांने अंध असून इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, हे प्रत्ययास आणलं. इच्छाशक्तीला आत्मविश्वासाची जोड असली की, कुठल्याही संकटावर मात करत आपल्या क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच जाऊ शकतो. हेच धुमाळ कुटुंबाने दाखवत आपली शेती उत्तम प्रकारे करून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 

दावचवाडी गावातील पालखेड रस्त्यावर शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी पांडुरंग यशवंत धुमाळ यांना २००१ मध्ये दोन्ही डोळे पूर्णपणे निकामी होऊन अंधत्व आले. अंधत्व आल्यानंतर पुढे लग्नाचा प्रश्न निर्माण झाला. परंतु योगायोगाने त्यांचा विवाहदेखील अंधत्व आलेल्या सविता यांच्याशी २०१७ मध्ये झाला. पांडुरंग धुमाळ व सविता धुमाळ हे दोघेही अंध असून त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे. मात्र पांडुरंग धुमाळ हे पहिल्यापासून शेतीत असल्याने ते शेतीची सर्व कामे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे करत असतात. त्यामुळेच पत्नीला सोबत घेत, आपल्या अंधत्वावर मात करून हे दोघेही धुमाळ पती-पत्नी दोन एकर द्राक्ष बाग व इतर कांदा आणि टोमॅटोची शेती स्वतः च  करीत असून त्यांना या कामी पांडुरंग यांची आई सिंधुबाई धुमाळ या मार्गदर्शन करीत असतात.

दुसरा प्रसंगही अवघडंच... 

पांडुरंग धुमाळ हे जन्माच्या काही वर्षांनंतर अंधत्व आल्यानंतर ते हळूहळू स्वावलंबी होत गेले. शिवाय शेतीच्या कामामध्येही आईवडिलांना हातभार लावत असतं. त्यामुळे आता शेतीची अनेक कामे स्वतः करत असतात. पिकांना पाणी भरणे, जनावरांना चारा टाकणे, ड्रीप गोळा करणे, वीज दुरुस्ती, पाटात पोहण्याचे कामही अगदी शिताफीने करतात. परंतु पांडुरंग यांच्या आयुष्यात दुसऱ्यांदा अगदी वाईट घटना काही वर्षांपूर्वी घडली. मळ्यात राहत असल्याने गावातून दळण घेऊन घरी येत असताना रस्त्यात रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होते. रस्त्याचे काम चालू असताना तापलेल्या डांबराच्या बादलीत दोन्ही पाय गेल्याने दोन्ही पायांवर मोठ्या जखमा झाल्या.  मात्र उपचार घेऊन पांडुरंग धुमाळ पुनश्च कामाला लागले. 

पतीसोबत शेतीची कामे शिकली!

पांडुरंग धुमाळ यांच्या आई सिंधताई म्हणतात की, शेती करणे परवडत नाही, पावडरी महाग झाल्या आहेत, मोठे शेतकऱ्यांना सध्या चांगले दिवस आहेत, मात्र आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं? पण अभिमान आहे या दोघांचाही शंभर टक्के अंध असूनही एवढी मोठी शेती करणे खूप मोठी गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या...तर त्यांच्या पत्नी सविता धुमाळ म्हणतात की, मी जन्मताच अंध असून माहेरी देखील नसल्याने शेती नसल्याने मला काहीच काम जमत नव्हतं, मात्र ज्या नंतर लग्न झाले त्यानंतर हळूहळू शेतीचे कामे शिकत गेले, आता सर्व द्राक्ष बागांची कामे मी स्वतः करत असते...सोबतीला मजूर घेऊन त्यांच्याकडून काम करून घेत असतो...! 

इतरांनीही घ्यावा आदर्श... 

काही कारणाने आयुष्यात अंधकार आला म्हणून खचून न जाता इच्छाशक्त्तीच्या जोरावर धुमाळ कुटुंब प्रयलांच्या माध्यमातून एक नवा प्रकाश आयुष्यामध्ये निर्माण करीत आहेत. धुमाळ कुटुंबीय संकटावर मात करत आपल्या संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकत आहेत. त्यांचे हे उदाहरण इतरांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे. सरकारने देखील आता अशा या अंध कुटुंबाकडे डोळसपणे बघून शासकीय मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकशेतीद्राक्षेनिफाड