Join us

Success Story : सूर्यफूल, करडईची शेती, सोबत तेल विक्रीचा व्यवसायही उभारला, तरुण शेतकऱ्याचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:04 PM

तरुण शेतकऱ्याने तेलबियांची लागवड करत त्याच तेलबियांपासून तेल काढून विक्री व्यवसाय उभा केला आहे.

- चंदन मोटघरे

भंडारा : आता पारंपरिक पद्धतीने शेती परवडणारी राहिली नाही. त्यामुळे तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करत चांगला आर्थिक फायदा करत आहेत. याच पद्धतीने अमित बोरकर या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली. निव्वळ एवढ्यावरच न थांबता महाडीबीटीच्या माध्यमातून तेल काढण्याचे यंत्र बसवून शेतात उत्पादित केलेल्या बियांचे तेल काढून बाजारातही आणले.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील युवा शेतकरी अमित बोरकर यांनी मागील तीन वर्षापूर्वी सूर्यफूल व करडई लागवडीला सुरुवात केली. परिसरात अशा पद्धतीने तेलबियांची लागवड करण्याचा हा प्रयोग प्रथमच होता. त्यामुळे यातून मिळालेले उत्पन्न इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ठरले व या शेतकऱ्याने तेलबिया लागवडीवरच न थांबता पुढचा मार्ग शोधला. 

कृषी विभाग व विद्यापीठातून माहिती घेतली व शास्त्रोक्त पद्धतीने लागवड सुरू केली. नंतर महाडीबीटीच्या माध्यमातून तेल काढण्याचे यंत्र बसवत स्वताच तेल काढून बाजारातही आणले. त्यामुळे परिसरातील लोकांना शुद्ध तेलही मिळाले व इतर शेतकऱ्यांना तेल काढून देण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता परिसरातील शेतकरीही आता सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी या तेलवर्गीय पिकांची लागवडीकडे वळत आहेत.

तेलबिया लागवड गरजेचे

तेलबियांची लागवड कमी झाल्याने खाद्यतेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. खाद्यतेलात होणारी मिलावट ही चिंतेची बाब असल्याने शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी व स्वतः उत्पादित केलेल्या तेलबियांचे तेल आपल्या आहारात वापरावे, असा सल्ला अमित आता शेतकऱ्यांना देत आहे. तो म्हणतो, तेल विकून चांगला आर्थिक फायदाही शेतकऱ्यांना घेता येईल. पारंपारिक शेतीएवजी आता शेतकऱ्यांनी नवा मार्ग शोधायला हवा.

तेलाची बॅण्डिंग करून विक्री

अमितने आपल्याच शेतात पिकविलेल्या तेलबियांपासून स्वतःच्याच तेल घाणीत तेल तयार करून आहारासाठी शुद्ध तेल बाजारात आणले आहे. ग्राहकांनी या शुद्ध तेलाला पसंती दिली. आता तर घरूनच या तेलाची विक्री व्हायला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर स्वतः प्रक्रिया करून बाजारपेठेत आणल्यास त्याचा चांगला आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना मिळतो, याचे उदाहरण अमित यांनी दिले आहे.

टॅग्स :शेतीभंडारातेल शुद्धिकरण प्रकल्पशेती क्षेत्र