Join us

Success Story : इलेक्ट्रॉनिक ट्रेडमध्ये आयटीआय, पण नोकरी न करता शेळीपालनाचा व्यवसाय उभारला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 7:57 PM

देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा येथील आयटीआय झालेल्या युवकाने शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे.

इलेक्ट्रॉनिक ट्रेडमध्ये आयटीआय केल्यानंतर शासकीय किंवा खासगी नोकरीच्या मागे न लागता देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा येथील प्रणयकुमार दिनकर नागोसे या युवकाने शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. 10 शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायाने आता भरारी घेतली आहे. सध्या त्यांच्याकडे 40 बकऱ्या आहेत.

घरी एक एकर शेती असल्याने शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा भार सांभाळणे कठीण होत होते. त्यामुळे त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाला सुरुवात केली. सुरुवातीला 10 शेळ्यांचे पालन सुरू केले. त्यातून चांगली कमाई होण्यास सुरुवात झाल्याने या व्यवसायात प्रणयकुमार यांची रुची वाढत गेली. हळूहळू व्यवसाय वाढवला. आज त्यांच्याकडे 40 बकऱ्या आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात स्वतंत्र शेड तयार केला आहे. या व्यवसायातून ते दरवर्षी जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. रोजगारासाठी प्रणयकुमार यांनी शोधलेली वेगळी वाट गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना प्रेरणा देणारी आहे.

कुक्कुटपालनही सुरू केले

शेळीपालनाला जोड व्यवसाय म्हणून प्रणयकुमार यांनी शेतात गावठी कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे सध्या जवळपास ७० कोंबड्या आहेत. गावठी कोंबडीच्या अंड्याला चांगला भाव व मागणी आहे. यातूनही ते पैसे कमावतात, त्या ठिकाणी दोन गायी आहेत. या माध्यमातून ते दुधाचा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे हे सर्व व्यवसाय केवळ एक एकर आगेत सुरू केले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण शेळीपालनासाठी अत्यंत लाभदायक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अतिशय चांगला व्यवसाय आहे. यातून शेतकऱ्याला अधिकची कमाई करण्याचे साधन उपलब्ध होते. नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे.

- प्रणयकुमार नागोसे

टॅग्स :शेतीगडचिरोलीशेळीपालनशेती क्षेत्र