Join us

महारेशीम अभियानात महाराष्ट्रातून हा जिल्हा अव्वल, दुष्काळात रेशीम लागवड करत पटकावला पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 9:50 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात २५४४ इतकी तुती लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

रेशीम शेती व त्यावरील प्रक्रिया उद्योगाने जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण होत आहे. चालू वर्षात नवीन तुती लागवड करण्यासाठी जालना जिल्ह्याला ३५० एकर लक्ष्यांक देण्यात आला होता, प्रत्यक्षात सुमारे २०४६ एकरकरिता नोंदणी झाल्याने जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर ७०२ इतक्या नवीन लाभार्थ्यांची विक्रमी नोंदणी करत अंबड तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात २५४४ इतकी तुती लागवडीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ८२६ तुती लागवडीची कामे सुरू असून आतापर्यंत १२६१ तुती लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.याबद्दल प्रजासत्ताक दिनी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरिष्ठ क्षेत्र सहायक शरद जगताप, तांत्रिक सहायक सुनील काळे यांना पालकमंत्री अतुल सावे यांनी सन्मानित केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना उपस्थित होते.

थंडीपासून रेशीम शेतीचे संरक्षण कसे करावे? तापमान नियंत्रणासाठी हे करा..

यावर्षी अंबड तालुक्यात तीव्र दुष्काळ आहे. पारंपरिक शेती उदाहरणार्थ कापूस पीक भरवशाचे राहिलेले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजूनही रेशीम लागवडीकडे वळावे. -चंद्रकांत शेळके, तहसीलदार

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रिलिंग मशीनची उभारणी

१. जालना शहरातच रेशीम कोष खरेदी-विक्रीची बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दूर जाण्याची गरज नाही.

२. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅटोमॅटीक रिलिग मशीनचीही उभारणी करण्यात आली असून याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाच्या रेशीम सुताची निर्मिती करण्यात येत आहे.

3. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला असून या ठिकाणी पैठणी साडीकरिता आवश्यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे. रेशीम सूत उत्पादनाची पुढील प्रक्रिया जसे की हातमागावर कापड बनविण्याचे काम लवकरच जालना येथे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

४. यामुळे रेशीम कोषांवर सर्व प्रक्रिया जिल्ह्यातच होऊन जालना सिल्क ब्रॅण्डचा रेशीम कपडा जालना येथेच तयार होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. अशी माहिती अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

टॅग्स :रेशीमशेतीजालनासरकारी योजना