Join us

तुमच्या मुलीच्या नावे करा वृक्ष लागवड, सरकार करेल मदत, काय आहे योजना? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 1:43 PM

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना राबवली जात आहे.

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारतर्फे मदत केली जात आहे. त्यात ५ रोपे सागाची, २ रोपे आंब्याची, फणस, जांभुळ व चिंचेच्या प्रत्येकी  एका रोपाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींसाठीच दिला जात आहे. 

योजनेचा उद्देश :

वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वनाखाली आणणे.  ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे. पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादी बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे. अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे. तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे. 

योजनेचे स्वरूप : 

सदर योजनेच्या लाभाकरिता शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा. ज्या शेतकरी दांपत्यास मुलगी होईल त्या शेतकरी दांपत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळयात दि.१ ते ७ जुलै या कालावधीत १० झाडे लावण्याची संमती विहित नमुन्यातील अर्जात दर्शवावी.

अर्जामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, संपर्कासाठी संपूर्ण पत्ता व आधार कार्ड नंबर इत्यादिचा उल्लेख करावा. मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळयापूर्वी वृक्षारोपणासाठी १० खड्डे खोदून तयार ठेवावेत. नजीकच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून ग्रामपंचायतीमार्फत १० रोपे विनामूल्य दिली जातील. त्यामध्ये ५ रोपे सागाची / सागवान जडया, २ रोपे आंबा, १ फणस, १ जांभूळ आणि १ चिंच इत्यादि. भौगोलिक परिस्थितीनुसार प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल.

एकंदर १० झाडांची लागवड पूर्ण झाल्यावर लागवड केलेल्या ठिकाणाचे तपशील व मोबाईलद्वारे किंवा कॅमेराद्वारे रोपांचे फोटो संबंधित शेतकऱ्यामार्फत ग्रामपंचायतीस सादर केले जातील. सदर माहिती ग्रामपंचायतीमार्फत एकत्रित करून तालुका स्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी ३१ जुलै, पर्यंत पाठविली जाईल. १ जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप. १ ते ७ जुलै वृक्षलागवड.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमहिला आणि बालविकासइनडोअर प्लाण्ट्ससरकार