Join us

यंदा मिरचीचे भाव पडण्यामागे कारण काय‌?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 5:07 PM

लाल मिरचीच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत घसरण, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्याचे काय म्हणणे?

सलग दोन वर्षे लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा जास्त लागवड केली. मागील दोन वर्षांपासून लाल मिरचीने भाववाढीचा उच्चांक गाठला होता. परंतु, यंदा उत्पादन जास्त झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व प्रकारच्या लाल मिरचीच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी भावात घसरण झाली आहे. लाल मिरची भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे.

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली जाते. राज्यात नागपूर, पुणे, वाशी, सांगली, नगर आणि नंदुरबार मार्केटमध्ये मिरचीची सर्वाधिक उलाढाल होते. पुण्यातील मसाला प्रक्रिया उद्योगांकडून तसेच मसाला विक्रेते, कोकण, सातारा व पुणे जिल्ह्यांतून मिरचीला सर्वाधिक मागणी आहे. उन्हाळाच्या सुटीत ग्रामीण भागासह शहरात अजूनही घरगुती तिकट मसाला बनवण्यासाठी बाजारात मिरची खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.

या राज्यातून आवक : मध्य प्रदेशातील लाल मिरचीचे सर्वाधिक पीक निघते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, आसाम, राजस्थान, महाराष्ट्रातून नंदुरबार, नागपूर, लातूर येथून लाल मिरचीची आवक होते.

भाव घटण्याची कारणे

■ लाल मिरचीची लागवड जास्त झाल्याने आवक वाढली.

■ यंदा पोषक वातावरणामुळे उत्पन्नही वाढले.

■ कोल्ड स्टोअरेजमध्ये माल शिल्लक ठेवला जात आहे.

■ देशातील मिरची उत्पादनापैकी ७० टक्के मिरची देशांतर्गत वापरली जाते, तर उर्वरित ३० टक्के निर्यात केली जाते.

भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे तिखट मिरची, कर्नाटकमध्ये कमी तिखट मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यंदा कोल्ड स्टोअरेजमध्ये लाल मिरचीची साठवणूक केली जात आहे. उत्पादन क्षेत्रात मसाला कारखानदारांकडून मिरचीला मागणी वाढली आहे. यंदा मागील वर्षीपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के भावात घट झाली आहे. - वालचंद संचेती, ज्येष्ठ मिरची व्यापारी, मार्केट यार्ड

सलग दोन वर्षे लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा जास्त लागवड केली. महाराष्ट्रात, खान्देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. कोल्हापूरवरून पूर्वी उत्पादन घेतले जात होते. मात्र, सध्या येथून आवक होत नसल्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथे तिखट मिरची आवक होत आहे.- राजेंद्र गुगले, व्यापारी

या देशांत होते निर्यात

चीन, थायलंड, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलँड, जपान, स्वीडन, कॅनडा, इराण, ऑस्ट्रेलिया, इटली, कर्नाटक बेडगीला जागतिक मागणी आहे. कर्नाटक राज्यात पिकणाऱ्या बेडगी मिरचीच्या रंग आणि तिखटपणामुळे या मिरचीला जागतिक बाजारात मोठी मागणी आहे.

टॅग्स :बाजारमिरची