Join us

जगभरात प्रादेशिक ओळख मिळवून देणारा जीआय टॅग म्हणजे काय? कसा दिला जातो?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 06, 2023 6:00 PM

तुळजापूरच्या कवड्यांच्या माळांसह कुंथलगिरीच्या खव्यालाही मिळाले मानांकन...

राज्यात नुकताच चिंच, कोथिंबीरीसह ९ पदार्थांना भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI टॅग देण्यात आले आहेत. त्यात मराठवाड्यातील ६ पदार्थांचा समावेश आहे.यात तूळजापूरच्या कवडीच्या माळेसह कुंथलगिरीच्या खव्याचाही समावेश आहे.

या निर्देशांकामुळे त्या उत्पादनांची ओळख देशभरात किंबहूना जगभरात होते. जगभरात ओळख मिळवून देणारा भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI टॅग म्हणजे काय? तो कसा दिला जातो? जाणून घेऊया...

जीआय मानांकन म्हणजे काय?

एखाद्या पदार्थाला,वस्तूला जागतिक दर्जावर ओळख मिळण्यासाठी त्याचे प्रमाणीकरण व्हावे लागते. यासाठी त्या भूगोलात मुळ असणाऱ्या पदार्थाला जीआय मानांकन दिले जाते. जीआय प्रणाली जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत आहे. भारतात जीआय मानांकन १९९९ च्या जीआय कायद्यानुसार दिले जाते. यासाठी केंद्र सरकारला अर्ज द्यावा लागताे.

कसा दिला जातो जीआय टॅग?

जीआय मानांकनाची प्रक्रीया सुरू होऊन दोन अडीच वर्षापूर्वी सुरू झाल्याची माहिती गणेश हिंगमिरे यांनी 'लोकमत ॲग्रो'शी बोलताना दिली. एखाद्या प्रदेशातला वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ ओळखून त्यावर संशोधन करणं हा त्यातला पहिला टप्पा असतो.एखाद्या पदार्थात विशेष काय आणि का हे पाहण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून हे संशोधन करणं गरजेचं ठरतं. ते झाल्यानंतर केंद्र सरकारकडे त्या पदार्थाचा त्याच्या संशोधनासहित अर्ज करावा लागतो. त्यात त्या पदार्थाचा भूगोल, इतिहास आणि शास्त्र याचा समावेश असतो.

भूगोल, इतिहास आणि शास्त्र

ज्या पदार्थाला जीआय मानांकन द्यायचे आहे, त्याचे शास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन होणे फार महत्त्वाचे आहे. हे संशोधन तीन प्रकारात केले जाते. भूगोल, इतिहास आणि शास्त्र. एखाद्या पदार्थ विशिष्ट भुगोलातलाच असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळेच त्याच्या प्रादेशिक खुणांचे दाखले देऊन त्याचा दर्जा ठरवता येतो. 

उदाहरणार्थ तुळजापूरची कवड्यांची माळ. महाराष्ट्रातलं परडी आणि कवडीचं महत्व हे फार पूर्वीपासून आहे. तुळजाभवानीचरणी असणारी कवड्यांची माळ तुळजापूरच्या भूगोलाशी तिथल्या लोकसंस्कृतीशी जोडली गेली. तानाजी मालुसरेंनी जेंव्हा देह ठेवला तेंव्हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या गळ्यातली कवड्यांची माळ त्यांच्या देहावर ठेवली होती. ही माळ मालुसरेंच्या कुटुंबाकडे १२ पिढ्यांपासून असल्याचा इतिहास आहे. याशिवाय या माळेच्या एकत्रिकरणानंतर एक विशिष्ट ऊर्जा तयार होते हे त्यामागचे शास्त्र. या तिन्ही बाबी जीआय मानांकनासाठी दिल्यानंतर त्याला हा टॅग मिळतो.चिंचेचा इतिहास ३०० वर्षांहून जूना..

आपल्याकडे चिंचेची झांडं शेकडो वर्षांपासून आहे. म्हणूनच  चिंचपूर, पानचिंचोली अशी गावांनादेखील नावं पडली.  एखाद्या प्रांतात चिंचेची झाडं अधिक असणं, त्या प्रदेशाला चिंचेचा इतिहास असणं हे त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य होत गेलं. त्या भागाची ती गोष्ट असं जनमानसांतही रूजू लागतं. हा टॅग मिळाल्यानं त्या प्रदेशाचं त्या पदार्थामुळेही नाव होतं. पण चिंचेची झाडं सरसकट अनेक भागात पहायला मिळत असताना पानचिंचोलीच्या चिंचेलाच GI मानांकन कसे मिळाले? याचे शास्त्र सांगताना गणेश  हिंगमिरे म्हणाले, पानचिंचोली गावातील चिंच ही इतर भागात पिकणाऱ्या चिंचेपेक्षा मोठी होती. ही चिंच एक- एक फूट लांब असल्याचं आढळून आलं. इतर भागातील चिंचेच्या झाडांना जेवढ्या चिंचा येतात त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात पानचिंचोलीतील चिंचेच्या झाडांना येतात. या निकषांना समोर ठेऊन ३०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या चिंचेला GI मानांकन मिळाले.

सुवासिक कोथिंबीरीलाही मानांकन

लातूरमधील आशिव,औसा परिसरासह २० ते २५ गावांमध्ये पिकली जाणारी कोथिंबीर ही सुवासिक आहे. दिल्लीलाही ही कोथिंबीर पाठवली जाते. या कोथिंबीरीला कास्ती असं नाव आहे. कास्ती कोथिंबीर इतर कोथिंबिरीच्या तुलनेत अधिक सुगंधित असल्याने बाजारात तिला मोठी मागणी आहे.

जालन्याची दगडी ज्वारी

दगडासारखी टणक असणाऱ्या जालन्याच्या दगडी ज्वारीलाही हे मानांकन मिळाले आहे. या ज्वारीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या टणक आणि दगडासारख्या गुणधर्मामुळे कुठल्याही पक्ष्याला या ज्वारीवर चोच मारता येत नाही. धाराशिवचा कुंथलगिरीचा प्रसिद्ध खवा, बदलापूरचं जांभूळ, बोरसुरीच्या तूरडाळीचाही या मानांकनात समावेश आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रइतिहासलातूरतुळजापूर