Join us

गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड राज्यांना लातूरच्या केसरची गोडी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:59 AM

चवीत गोडवा असलेल्या केसर आंब्याची आवक वाढली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंडच्या ग्राहकांनाही याचा लळा लागला आहे.

पाणीटंचाई, वादळी वारे, अवकाळी पावसामुळे गळती झाल्याने गावरान आंब्यांचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. हा आंबा अजूनही लातूरच्या बाजारात दाखल झाला नाही. याउलट चवीत गोडवा असलेल्या केसर आंब्याची आवक वाढली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंडच्या ग्राहकांनाही याचा लळा लागला असून दोन दिवसांत जवळपास ६ हजार टन आंब्यांची निर्यात झाली आहे.

राज्यात आंबा म्हटले की, कोकणचा हापूस सर्वात अगोदर पुढे येतो, त्याची ख्यातीही देशभर आहे. मात्र, दिवसेंदिवस हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री केली जात असल्याने फसवणुकीचे प्रकार समोर येऊ लागले. लातूर, धाराशिव,नांदेड, परभणीसह कर्नाटक, तेलंगणात केसर आंब्याचे उत्पादन मागील काही वर्षांपासून चांगलेच वाढले आहे. मराठवाड्यात लातूरच्या फळबाजारात केसर आंब्याची आवक दररोज दीडशे टनाच्या जवळपास आहे.

यातील २५ ते ३० टक्के आंबा स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. उर्वरित आंब्याची परराज्यात निर्यात केली जात आहे. जवळपास १०० टन केसर आंबा गुजरात, मध्य प्रदेश झारखंड राज्यांत पाठविला जात आहे. यंदा देशभरात आंब्यांचे उत्पादन कमी झाल्याने आंब्याला मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रतिटन ७ ते १० हजारांचा दर...

यंदा केसर आंब्याने चांगलाच भाव खाल्ला असून, किमान ७ हजारांपासून प्रतिटनाचा दर असून, चांगल्या प्रतीच्या आंब्याला १० हजारला टन भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेतही पिकलेल्या केसर आंब्याची विक्री १२० ते १५० रुपये किलोप्रमाणे होत आहे.

* परराज्यांतील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोखीने व्यवहार करीत आहेत. शिवाय, लातूरच्या फळबाजारात आलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहेत.

सीमाभागांतील शेतकरीही बाजारात...

* गुजरातमध्ये यंदा उत्पादन कमी झाल्याने तेथील खवय्यांना लातूरच्या केसरचा गोडवा वाढला आहे.

* दोन महिन्यांपासून गुजरात, झारखंड, मध्य प्रदेशासह अन्य ठिकाणी आंब्याची निर्यात होत असल्याचे व्यापारी शब्बीर बागवान, बरकत बागवान यांनी सांगितले.

१ जूनपर्यंत दर स्थिर राहतील...

* बाजारात सध्या केसर आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत केसरचे दर स्थिर राहतील.

आपल्याकडील निर्यात बंद झाली की इतर ठिकाणांहून आपल्याकडे आंब्यांची आवक होईल. त्यानंतर दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

गुजरातचे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर...

* केसर आंब्याचा गोडवा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील पाच वर्षांतील निर्यातीचा उच्चांक यंदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी गुजरात राज्यातून केसर, बदाम, लालबाग आदी प्रकारचे आंबे लातूरच्या बाजारात येतात. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे.

* त्या ठिकाणचे उत्पादन कमी झाल्याने मराठवाड्यात अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आंब्याची खरेदी करीत आहेत. दररोज १०० ते १२० टन आंबा परराज्यांत निर्यात होत आहे.

टॅग्स :आंबाबाजारशेती