Join us

Sugarcane Crushing Season : राज्यातील साखर गाळप हंगामाची अखेर सांगता! किती झाले साखर उत्पादन?

By दत्ता लवांडे | Published: May 16, 2024 3:54 PM

पुणे : राज्यातील लांबलेल्या साखर हंगामाची अखेर सांगता झाली आहे. १४ मे अखेर राज्यातील शेवटच्या साखर कारखान्याचे धुराडे बंद झाले ...

पुणे : राज्यातील लांबलेल्या साखर हंगामाची अखेर सांगता झाली आहे. १४ मे अखेर राज्यातील शेवटच्या साखर कारखान्याचे धुराडे बंद झाले असून साखर आयुक्तालयाकडून साखर गाळपाचा शेवटचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील मानस अॅग्रो कारखान्याने सर्वांत शेवटी आपले गाळप थांबवले आहे.

दरम्यान, यंदा राज्यात गाळप केलेल्या एकूण २०७ साखर कारखान्यांपैकी खासगी साखर कारखान्यांची संख्या जास्त होती. त्यापैकी १०३ सहकारी तर १०४ खासगी साखर कारखाने होते. त्यापैकी सर्व साखर कारखान्यांचे गाळप १४ मे अखेर संपलेले आहे. तर यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही अधिक झाले आहे. त्यामुळे यंदाचा उस गाळप हंगाम मागच्या वर्षीपेक्षा सरस ठरला आहे. 

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यातील गाळप हंगाम लवकर संपेल आणि साखरेचे उत्पादनही घटेल अशी शक्यता होती पण नोव्हेंबरअखेर झालेल्या अवकाळी पावसाचा फायदा उसाला झाल्याचे चित्र आहे.

दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. यामुळे थेट पाकापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मिती थांबली होती. यामुळे साखर उत्पादनात वाढ झाली असून नंतर केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध शिथिल केले आहेत.

साखर उत्पादन वाढले यंदा राज्यात १०७३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १ हजार १०१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागच्या वर्षी १ हजार ५५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून १ हजार ५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. पण त्यातुलनेत यंदा ४८ लाख क्विंटल साखरेचे जास्त उत्पादन झाले आहे. 

साखर उताराही अधिकमागच्या वर्षीचा राज्यातील सरासरी साखर उतारा हा ९.९८ एवढा होता. तर यंदा साखर उताऱ्यामध्ये वाढ होऊन १०.२७ एवढा झाला आहे. यामुळे साखर उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. 

विभागवार साखर उत्पादन

  • कोल्हापूर विभाग - २८०.६४ लाख क्विंटल
  • पुणे विभाग - २५१.३१ लाख क्विंटल
  • सोलापूर विभाग - २०६.५९ लाख क्विंटल
  • अहमदनगर विभाग - १४१.१२ लाख क्विंटल
  • छत्रपती संभाजीनगर विभाग - ८८.५३ लाख क्विंटल
  • नांदेड विभाग - १२०.८५ लाख क्विंटल
  • अमरावती विभाग - ९.३९ लाख क्विंटल
  • नागपूर विभाग - ३.२७ लाख क्विंटल 
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊस