Join us

सोयाबीन बियाणं पेरताय? पेरणीपूर्वी कृषी विभागानं काय सांगितलंय वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 2:05 PM

सोयाबीन पेरणीपूर्वी शेतकऱ्यांकरता कृषी विभागाचे परिपत्रक

सध्या पेरणीपूर्व मशागत पूर्ण होत आली असून सोयाबीन बियाणं पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणांचा वापर पेरणीसाठी करू शकतात असे कृषी विभागाने सांगितले आहे. सोयाबीन पेरण्यांसदर्भातील परिपत्रकात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पेरणीपूर्व सल्ला देण्यात आला आहे.

मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाणांची निवड करता येते. सोयाबीन बियाण्याची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सोयाबीन बियाणांची साठवणूक करताना..

  • बियाण्यांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
  • घरगुती बियाणे वापरत असल्यास अंकुरण क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावी.
  • साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर न करता ज्यूट बारदानाचा वापर करावा.
  • बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रीया करावी.
  • रायझाेबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्व तीन तास आगाेदर बीजप्रक्रीया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.
टॅग्स :सोयाबीनपेरणीशेती