Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अद्याप केवळ चार टक्के पेरण्या; दुबार पेरण्यांचेही सावट

By नितीन चौधरी | Updated: July 3, 2023 14:37 IST

येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरण्यांची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे खरिपाची परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती कृषीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पुणे : एक आठवड्यापूर्वी राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने कोकण वगळता राज्यात अन्यत्र जोर धरला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत उण्यापुऱ्या चार टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तेथेही पावसाची मोठी गरज निर्माण झाली असून येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरण्यांची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे खरिपाची परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती कृषीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

यंदा पाऊस लांबल्याने राज्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३.७० टक्के अर्थात ५ लाख २५ हजार २० हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी २७ जूनपर्यंत १६ लाख ९२ हजार २७० हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा त्या तुलनेत पेरणी अत्यल्प असल्याचे दिसून येते.

नागपूर विभागाची आघाडी■ विभागनिहाय पेरणीचा आढावा घेतल्यास ३० जूनअखेर नागपूर विभागात १ लाख ७० हजार ६५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सर्वांत कमी पेरणी लातूर विभागात झाली आहे. येथे केवळ १५ हजार १९२ हेक्टरवर पेरण्या झाल्या.

■ कोकणात पाऊस चांगला झाला असला तरी भात लागवडीसाठी चिखलणी होऊ न शकल्याने पेरण्यांना गती आलेली नाही. त्यामुळे कोकणात अद्याप केवळ २७ हजार ५९० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तर नाशिक विभागात १ लाख २३ हजार ३८३ हेक्टर, पुणे विभागात २० हजार ८८३, कोल्हापूर ३८ हजार ८८२, संभाजीनगर ६० हजार ३२२, अमरावती ६८ हजार ११७ हेक्टर पेरणी झाली.

जूनमध्ये केवळ ५३ टक्के पाऊस राज्याची जूनची सरासरी २०७ मिमी असून ३० जूनपर्यंत ११५.५ मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. कोकणात ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर नागपूर विभागात ६७ टक्के पाऊस झाला आहे. नागपूर विभागातील गोंदियात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर भंडाऱ्यात सरासरीच्या जवळ पाऊस झाला आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस अमरावती विभागात ३२.९ टक्के झाला आहे.

कपाशी, सोयाबीन संकटातविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. जूनच्या दुसऱ्या आठवड्या पासून पेरणी सुरु होते; मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्याच रखडल्या आहेत. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात धूळ पेरण्या झाल्या होत्या.

टॅग्स :मोसमी पाऊसखरीपपेरणी