Join us

बुद्धपोर्णिमेला जाणून घेऊया गौतम बुद्धांची वैचारिक शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:31 PM

काय आहे बुद्धांची दुःख निवारण्याची शेती ?

भारताचे महान सुपुत्र, बुद्धत्त्व प्राप्त झालेले जगातील एकमेव, भगवान बुद्ध यांच्या आयुष्यातील तीन प्रमुख घटना एकाच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्यांचा जन्म, बुद्धत्त्व आणि महापरिनिर्वाण हे याच दिवशी झाले. इ.स.पूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेल्या बुद्धांनी, जगाला मानवी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला जो अद्वितीय आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याचे तसेच बुद्धत्त्व प्राप्त घेण्याचा अधिकार आहे असे ते मानत. एवढेच नव्हे तर स्त्रियांना देखील बोधी प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे केवळ सांगितलेच नाही तर जगातील पहिला भिक्खुणी संघाची स्थापना केली. 

सतत पंचेचाळीस वर्षे त्यांनी मानवकल्याणाचा मार्ग सर्वांना सांगत; मग ते राजा असो कि सर्वसामान्यजन. बुद्धांच्या आयुष्यात निसर्गाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचे वडील शाक्य गणाचे प्रमुख होते, ज्यांची शेकडो एकर शेती होती. बुद्धांचा जन्म लुम्बिनी नावाच्या वनामध्ये झाला. लहानपणापासून त्यांना ध्यानाची खूप आवड होती. त्याकाळी त्यांच्या शेतातील जांभूळ वृक्षाखाली ते ध्यान करीत बसत. त्यांना बुद्धत्त्व देखील पिंपळ वृक्षाखाली ध्यान करताना प्राप्त झाले. त्यांचे महापरिनिर्वाण देखील दोन शालवृक्षांच्या सावलीत झाले.

एकदा बुद्ध वर्षावासानिमित्त मगध राज्यातील एकनाला गावातील दक्खिणगिरी नावाच्या विहारात मुक्कामाला होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, बुद्ध पिण्डपात करण्यासाठी निघाले असताना, कृषी भारद्वाज नावाच्या श्रीमंत शेतकऱ्याच्या घराजवळ थांबले. बुद्धांकडे पाहत, भारद्वाज म्हणाला,"समण, मी शेती कसतो, पिकवतो. शेती कसून, पिकवून, मी ते धान्य खातो. समण, तू धडधाकट दिसतो आहेस; तू देखील शेती कसून, पीक घेऊन, स्वतः खाऊ शकतो”.  

पिण्डपात करण्यापेक्षा बुद्धांनी शेती करून, स्वतःचे अन्न पिकवून खावे असा त्याचा उद्देश होता. बुद्धांनी त्याच्याकडे स्मितहास्याने पाहिले आणि म्हणाले,"ब्राह्मणा, मी देखील जमीन कसतो, शेत पिकवितो, शेत कसून, पिकवून, धान्य खातो” यावर भारद्वाज म्हणाला कि मला तर तसं काहीच दिसत नाही. तुझी शेती कुठे, बैलं कुठे, अवजारे कुठे?

बुद्ध त्याला म्हणाले, “हे भारद्वाज, भ्रांत झालेल्या माणसांची अंतःकरणे ही माझी शेती आहे. प्रज्ञा हा माझा नांगर आहे, तर वीर्य हे माझे बैल आहेत; धम्माचरण हा माझा दंड आहे तर श्रद्धा हे माझे बीज आहे. मी सर्वत्र फिरून, माणसांच्या मनातील तृण म्हणजे काम, क्रोध, द्वेष, लोभ, मोह आणि मत्सर काढून टाकतो व ज्ञान, प्रज्ञा, शील व करुणा याची पेरणी करतो.

यावर मी सदाचरण व सद्सद्विवेकबुद्धीची वृष्टी करतो आणि त्यातून जे निर्वाणपदाचे म्हणजेच दुःखमुक्तीचे पीक माझ्या हाती येते तेच माझे नैतिक पीक होय! भारद्वाज, अज्ञानामुळे, अविद्येमुळे भ्रांत झालेल्या माणसांना, शाश्वत असा सदाचरणाचा मार्ग शिकवून त्यांना दुःखमुक्त करणे हीच माझी शेती होय!

प्रत्येकाला समजेल अशा भाषेत बुद्ध सर्वांना धम्म समजावून सांगत. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा.

लेखक अतुल मुरलीधर भोसेकर बौद्ध संस्कृती अभ्यासक, मो.नं. ९५४५२७७४१०

टॅग्स :बुद्ध पौर्णिमाशेती