Join us

निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 11:15 AM

श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय खत घेऊन जा.

गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करताना तुम्ही पान, फुले, फळे, पत्री त्याच्या चरणी वाहत असालच. श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय खत घेऊन जा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्नित कृषी महाविद्यालय महाड आणि महाड नगर परिषदेकडून केले जात आहे.

कोकणात लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. बाप्पाच्या आदरातिथ्यात कमतरता राहू नये, याची प्रत्येक भक्त मनोभावे काळजी घेतो आहे. बाप्पाची पूजा करताना त्याला पाने, फुले, हार, फळे, पत्री, दुर्वा असे सारे काही मनोभावे रोज अर्पण केले जाते. या पाना-फुलांचे दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते. हे निर्माल्य कचऱ्याच्या डब्यात तेथून घंटागाडीत आणि नंतर थेट कचरा डेपोमध्ये जाते. परमेश्वरचरणी वाहिले जाणारे हे निर्माल्य पुन्हा निसर्गामध्येच एकरूप व्हावे ह्या संकल्पनेतून उत्सवकाळात घरातून निघणारे निर्माल्य श्री गणेश भक्तांनी फेकून न देता संकलित करावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर यांनी केले आहे.

खत झाडांना घाला अन् निसर्ग देवतेचे स्मरण करा- निर्माल्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. हे खत, १५ जानेवारी २०२४ रोजी संक्रांतीला तिळगुळ देण्यासाठी येणाऱ्यांना भेट म्हणून दिले जाणार आहे.- घराच्या बाल्कनी, टेरेसवरील कुंड्या किंवा अंगणातील झाडांना हे सेंद्रिय खत टाकून निसर्ग देवतेला स्मरण्याचे आवाहन कृषी महाविद्यालयाकडून केले जात आहे.- या माध्यमातून भगवंताचे आशीर्वाद मिळावेत यासाठी श्री गणेश भक्तांनी निर्माल्य संकलनात सहयोग द्यावा, असे आवाहन कृषी महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :गणेशोत्सवविद्यापीठनगर पालिकाकोकणइको फ्रेंडली गणपती 2023