Join us

'कॉटन बेल्ट' क्षेत्रात बोगस बियाणांचा धोका, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:41 PM

यंदा यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ५७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार आहे.

यवतमाळ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाते. गुजरातसह तेलंगणातून बोगस बियाणे आणून हंगामापूर्वीच शेतशिवारात त्याचा साठा केला जातो. आठ तालुक्यात सोयाबीनऐवजी सर्वाधिक कपाशीची लागवड केली जाते. बोगस बियाण्याच्या काळाबाजार करणाऱ्या तस्करांची नजर ही जास्त पेरणी क्षेत्र असलेल्या 'कॉटल बेल्ट' वरच राहते. त्यामुळे या हंगामातही बोगस बियाण्यांचा धोका वाढला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात यंदा कृषी विभागाच्या नियोजनानुसार चार लाख ५७ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार आहे. तर, दोन लाख ९४ हजार २६० हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड अपेक्षित आहे. दारव्हा, नेर, पुसद, उमरखेड या तालुक्यात सोयाबीन लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. घाटंजी, कळंब, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव, वणी, यवतमाळ, झरी या तालुक्यात सर्वाधिक कपाशीला पसंती आहे. हा परिसर दुर्गम व सीमेलगत येत असल्याने तस्करांचे फावते. तेलंगणासह गुजरातमधून बोगस बियाणे आणून राळेगाव, मारेगाव, झरी, घाटंजी, पांढरकवडा या प्रमुख तालुक्यात हंगामापूर्वी साठेबाजी केली जाते. 

सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जाचा डोंगर सतत वाढतीवरच असून, उत्पन्नात घट होत आहे. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत त्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखविले जाते. कमी किमतीत शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून आणखी संकटात लोटले जाते. खरीप हंगामात दरवर्षी कृषी विभागाकडून बोगस बियाण्यासह खताच्या कारवाया केल्या जातात. मात्र, चौकशीचे घोडे 'मास्टरमाईंड 'पर्यंत पुढे सरकत नाही. परिणामी बोगस बियाण्याच्या तस्करीला आळा बसू शकला नाही. 

असे आहे कापूस लागवड क्षेत्र 

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन, कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदाही घाटंजी तालुक्यात ४२ हजार ५०० हेक्टर, मारेगाव तालुक्यात ३२ हजार ८५० हेक्टर, पांढरकवडा तालुका ४० हजार ५०० हेक्टर, राळेगाव तालुका ४४ हजार ५०० हेक्टर, कळंब तालुका २८ हजार ८०० हेक्टर, वणी तालुका ४१ हजार ५०० हेक्टर, यवतमाळ ३३ हजार हेक्टर, झरी तालुका २५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. 

टॅग्स :शेतीखतेयवतमाळशेती क्षेत्र