Join us

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी भगर विकत घेताय? अशी घ्या काळजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 11:29 AM

महाशिवरात्रीनिमित उपवासासाठी भगर खरेदी करत असाल तर काय काळजी घ्यावी, इथे वाचा सविस्तर

Mahashivratri 2024 : आज महाशिवरात्री असल्याने अनेकजण उपवासाला भगर खरेदी करत असतात. मात्र अनेकदा भगरीच्या माध्यमातून त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी भगर खरेदी करताना काळजी घेणं महत्वाचे असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून देखील वेळोवेळी आवाहन केले जाते. भगर खरेदी करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.... 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगर खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होत असते. अनेक नागरिक महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करत असल्याने उपवासाचे पदार्थ केले जातात. यात भगरीचा मोठा समावेश असतो. मात्र काहीवेळा भगरीमध्ये भेसळ, अनेक दिवसांची असलेली भगर यामुळे विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी मुदतबाह्य भगरीची विक्री करू नये. खुली भगर नागरिकांना विक्री केली तर कारवाई केली जाऊ शकते, असे आवाहन वारंवार अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनेकरण्यात येते. बहुतांशवेळा जुनी भगर खाल्ली तर त्यातून त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी भगर खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक असते. 

दरम्यान अशा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खूले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

अशी घ्या काळजी 

भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक/नोंदणी धारकाकडुनच खरेदी करावेत. भगर खरेदी करत असताना उत्पादकाचा तपशील, बेंच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत. पॅकेटवर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले, याचे तपशील असतो तो निट पाहून घ्यावा. त्यासह "Best Before म्हणजे भगरीची अंतीम वापरण्याची मुदत, केव्हा कालबाह्य होते ते ही तपासुन आणि खात्री करूनच खरेदी करावी. शिवाय भगरीचे पीठ बनवले तर ओलसर जागेवर ठेवायचं नाही, भगर वापरण्याचे भांडे स्वच्छ करावे, त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मनीष सानप यांनी सांगितले.  

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीमहाशिवरात्रीज्योतिर्लिंगनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३