Join us

Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2024 08:54 IST

Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ.

Kharif sowing with cotton and soybean sowing in Maharashtra मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात खरीप पेरण्यांचे प्रमाण तब्बल ४४ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्वाधिक ८१ टक्के पेरण्या धाराशिव जिल्ह्यात झाल्या असून, संभाजीनगर जिल्ह्यातही ८० टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या आहेत. तर खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या ५६ टक्के पेरण्या संपल्या असून, कापसाच्या ५३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात खरिपाचे १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ६१ लाख ६८ हजार ९७७ हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्राच्या हे प्रमाण ४३.४४ टक्के इतके आहे. सर्वाधिक ७२.४१ टक्के पेरण्या छत्रपती संभाजीनगर विभागात झाल्या असून, त्या खालोखाल पुणे विभागात ६०.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यानंतर लातूर विभागात ५७.२४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वात कमी ३.६९ टक्के पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत, तर नागपूर विभागही पिछाडीवर असून, येथे केवळ ९.०९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अमरावती विभागात ३६.७७ टक्के, तर कोल्हापूर विभागात २५.६७ टक्के व नाशिक विभागात ४३.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

धाराशिवमध्ये ८१ टक्के पेरण्या जिल्हानिहाय पेरण्यांचा विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ८१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातही ८०.७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यात ७०.३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. अमरावतीतील वाशिममध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने ७१.६४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. नाशिकमधील धुळे व जळगावातही अनुक्रमे ५५ व ५२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

सोयाबीनमध्ये लातूर आघाडीवर राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यात आतापर्यंत २३ लाख ५ हजार २१४ हेक्टर अर्थात ५६ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक पेरणी लातूर विभागात ११ लाख ५ हजार ८०६ हेक्टरवर झाली असून, त्या खालोखाल अमरावती विभागात ५ लाख ४९ हजार ९८५ हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख ७२ हजार ४९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कापसाची पेरणी ५३ टक्क्यांवर कापूस पिकाची पेरणी सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टरवर होत असून, आतापर्यंत २२ लाख ३० हजार २०३ हेक्टर अर्थात ५३.०९ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सर्वाधिक ७ लाख ५० हजार ४४६ हेक्टर अर्थात विभागाच्या सरासरीच्या ७१ टक्के पेरण्या संभाजीनगर विभागात झाल्या आहेत. त्यानंतर नाशिक विभागात ५ लाख ८४ हजार ६३८ हेक्टर अर्थात विभागाच्या सरासरीच्या ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने उडीद मुगाच्या पेरण्या गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढल्या आहेत. अजूनही काही जिल्ह्यांत पाऊस होत असल्याने यात आणखी वाढ होईल. - विनय आवटे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण

पीकनिहाय पेरणीची स्थिती (पीक क्षेत्र/ टक्के)

  • भात ७६,६०४--५
  • ज्वारी १८,६८५--६.५
  • बाजरी १,७२,८४०--२५.८
  • मका ५,००,०५२--५६
  • तूर ४,६५,१३२--३६
  • मूग १,०७,५०९--२७
  • उडीद १,७८,३६२--४८
  • सोयाबीन २३,०५,२१४--५६
  • कापूस २२,३०,२०३--५३.०९
  • एकूण ६१,६८,९७७--४३.४४
टॅग्स :खरीपपेरणीकापूससोयाबीनमोसमी पाऊसशेती