Join us

Kharif Perani: फवारणीनंतरही पिकांत ‘तणकट’ कायम, शेतकरी झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 09:47 IST

Kharif Perni and herbicide application: तणनाशक फवारणी केल्यानंतरही अनेक ठिकाणी शेतातील तणांचा बंदोबस्त झालेला नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

यंदा मान्सूनचे (Monsoon) वेळेवर आगमन झाल्याने शेतकरी सुखावला. सुरुवातीपासूनच रिसोड व मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस (heavy rain)  असल्याने या दोन्ही तालुक्यात वेळेवर पेरण्या (Kharif Sowing)  झाल्या. इतरही चार तालुक्यात अधूनमधून दमदार पाऊस झाल्याने ४ जुलैच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात पेरण्यांची सरासरी टक्केवारी ८८.५० वर पोहोचली. पिकांत हरळी, केणा, आगाडा, करडू, गाजर गवत यांसह विविध प्रकारचे तणकट उगवले असून, तणनियंत्रण (weed control)  करण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशक (herbicide)  फवारणीवर भर दिल्याचे दिसून येते.

काही शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केल्यानंतर तण जळून गेल्याचे दिसून येते तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तणकट कायम असल्याचे पाहावयास मिळते. तणनाशक फवारणी करूनही तण नियंत्रण न झालेले शेतकरी मजुरांद्वारे निंदण करण्याला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सध्या ग्रामीण भागात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, अर्ज प्रक्रिया आदींमध्ये महिला व्यस्त असल्याने निंदणासाठी मजूरही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पिकांतील तणनियंत्रण करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

पेरण्या अंतिम टप्प्यात वाशिम जिल्ह्यात ४ जुलैच्या आकडेवारीनुसार पेरण्या अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते. रिसोड व कारंजा तालुक्यात ९० टक्क्याच्या वर पेरण्या झाल्या असून वाशिम तालुक्यात सर्वात कमी ८६.६४ टक्के पेरण्या झाल्या. वाशिम तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यंदाही सोयाबीनचाच बोलबाला

यंदाही जिल्ह्यात सोयाबीन पेरणीचाच बोलबाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ५६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत २ लाख ७३ हजार ३२२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून, याची टक्केवारी ९१.२४ अशी येते.

कोणत्या पिकाची किती पेरणी? (पिकाचा प्रकार / हेक्टर)

  • सोयाबीन / २,७३,३१५
  • तूर / ५९,४९९
  • कपाशी / २२,६६०
  • मूग / १०६४
  • उडीद / १५३९

तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी

  • वाशिम / ८६.६४
  • रिसोड / ९०.६२
  • मालेगाव / ८९.३३
  • मं.पीर / ८९.६५
  • मानोरा / ८२.५९
  • कारंजा / ९०.५८
टॅग्स :खरीपकीड व रोग नियंत्रणशेती क्षेत्र