Join us

देशात भात लागवडीत ५ टक्क्यांची वाढ, कापूस, तेलबियांमध्ये घट

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 13, 2023 2:30 PM

देशात मागच्या वर्षीच्या तुलनेत भात लागवडीत वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भात लागवड क्षेत्रात साधारण पाच टक्क्यांची वाढ ...

देशात मागच्या वर्षीच्या तुलनेत भात लागवडीत वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भात लागवड क्षेत्रात साधारण पाच टक्क्यांची वाढ झाली असून आत्तापर्यंत 328.22 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागच्या वर्षी भात पेरणी 312.80 लाख हेक्टरवर झाली होती.

खरिपातील प्रमुख पीक असणाऱ्या भाताची लागवड वाढल्याची आकडेवारी कृषी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केली.

विशेष म्हणजे जुलै महिन्यात भारताने बिगर बासमती आणि पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर भारताने निर्बंध लादले होते. भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जागतिक बाजारपेठेत प्रतिस्पर्धी पुरवठादारांनी देशांतर्गत तांदळाची टंचाई वाढेल असे भाकीत केले होते. यावेळी पुरवठा आणि किमतींवर होणारा परिणाम वाढेल अशीही शक्यता वर्तवली जात होती. जागतिक बाजारात तांदूळ व्यापारात भारताचा 40 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. 

भात लागवड क्षेत्रात काही राज्यांमध्ये घट

मागील वर्षीच्या तुलनेत भात लागवड क्षेत्र जरी वाढले असले तरी काही राज्यांमधील भात क्षेत्र कमी झाल्याचे चित्र आहे. कमी लागवड झालेल्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, ओडिसा या राज्यांचा समावेश आहे.

ओडीसात भात पेरणीचे क्षेत्र 18.97 लाख हेक्टर यांनी कमी झाले असून मागील वर्षी ते 20.356 लाख हेक्टर होते. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात 8.28 लाख हेक्टरच्या तुलनेत 6. 86 लाख हेक्टर वरच भात पेरणी झाली. आसाममध्ये 16.25 लाख हेक्टरचा तुलनेत 14.92 लाख हेक्‍टरवर पेरणी झाली.

तेलबियांमध्ये घट

तेलबियांचे लागवड क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत घटले असून तूर, उडीद, मूग, कापूस आणि तागाच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली. यंदा तेलबियांची व्याप्ती . 184.61 लाख हेक्‍टरचा तुलनेत 183.33 लाख हेक्टरवर आली आहे.

कापूसही घटला

कापूस लागवडीतही यंदा घट झाल्याचे दिसत आहे. 120.94 लाख हेक्टर क्षेत्रावर मागील वर्षी देशात कापूस लागवड झाली होती ती 119.21 टक्क्यांवर यंदा आली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपेरणीशेतीअन्न