Join us

किती वाढल्या रासायनिक खतांच्या किंमती? किती आहेत खरे दर? जाणून घ्या सविस्तर

By दत्ता लवांडे | Published: May 08, 2024 9:16 PM

खतांचे दर वाढल्याच्या अफवा दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पसरल्या होत्या.

पुणे :  राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी जोमात सुरू असून खतांची आणि बियाणांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यातील खतांचे दर वाढल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्पेट, डीएपी अशा खतांचे दर वाढल्याचं सांगण्यात आलं होतं. 

पण अशा प्रकारे कोणत्याही दरवाढ झाली नसल्याचं स्पष्टीकरण कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे खताचे असलेले दर स्थिर असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदाच्या हंगमात दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत जास्त खतांची उपलब्धता असल्यामुळे संपूर्ण खरीप हंगामात दरवाढ होणार नसल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

अनुदानित खतांचे दर हे  स्थिर असून युरियाच्या एका गोणीचा दर हा २६६.५० रूपये प्रतिगोणी, डीएपी - १३५० रूपये, एमओपी - १६५५ ते १७०० रूपये, एनपी - १५०० ते १७०० रूपये, एनपीएस २४ः२४ः०ः८  - १६०० रूपये असे दर रासायनिक खतांचे आहेत. तर या दरांमध्ये या काही दिवसांत वाढ झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्याचे खतांचे दरखताचे नाव - विक्री किंमत (प्रतिगोणी)

  • युरिया - २६६.५० 
  • डीएपी - १३५०
  • एमओपी - १६५५ ते १७०० 
  • एनपीके (१९ः१९ः१९) - १६५०
  • एनपीके (१०ः२६ः२६) - १४७०
  • एनपीके (१४ः३५ः१४) - १७००
  • एनपीएस (२०ः२०ः०ः१३) - १२००-१४००
  • एसएसपी (जी) - ५३०.५९
  • एसएसपी (पी) - ४९०.५५
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखते