Join us

राज्यात खरिपाच्या पिकांसाठी किती रासायनिक खत उपलब्ध? कसे आहे नियोजन?

By दत्ता लवांडे | Published: May 08, 2024 8:28 PM

खरिपाचा हंगाम जवळ येत असून राज्यातील शेतकऱ्यांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे.

पुणे : भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी सुखावला आहे. तर सध्या कडक उन्हाळा सुरू असून खरीप हंगामाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी शेतीच्या मशागती, नांगरट सुरू असून पहिल्याच पावसानंतर पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. 

त्याचबरोबर खरिपासाठी लागणाऱ्या खते आणि बियाणांच्या उपलब्धतेसाठी राज्याच्या कृषी विभागाकडून चांगलीय तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या खरिप हंगामासाठी राज्यात ४५. ५३ लाख मेट्रीक टन खतांचे मंजूर नियोजन असून १ एप्रिल २०२४ रोजी खतांचा साठा हा २५ लाख मेट्रीक टन एवढा होता. त्यामुळे यंदा खतांची कमतरता भासणार नाही अशी शक्यता आहे. 

दरम्यान, खरिपासाठी अनेक शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली असून आत्तापर्यंत राज्यामध्ये २.४४ लाख मेट्रीक टन खताची विक्री झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या ३१.७४ लाख मेट्रीक टन खतांच्या साठ्यापैकी विक्री झालेले खत वगळता सध्या २९.३० लाख मेट्रीक टनाचा साठा राज्यामध्ये आहे. 

त्याचबरोबर राज्यामध्ये नॅनो युरियाचा साठा हा २० लाख बॉटल्स आणि नॅनो डीएपीचा साठा हा १० लाख बॉटल्स एवढा असून १.५ लाख टन युरिया आणि २५ हजार टन डीएपीच्या संरक्षित साठ्याची सोय कृषी विभागाने केली आहे. 

 

किती आहे खतांची उपलब्धता?

खतांचे नाव - मंजूर नियोजन - ८ मे रोजी उपलब्ध साठा(आकडे लाख मेट्रीक टनामध्ये)

  • युरिया - १३.७३ - ९.०४
  • डीएपी - ५ - १.५३
  • एमओपी - १.३० - ०.७२
  • संयुक्त खते - १८- १३.०२
  • एसएसपी - ७.५० - ४.९
  • नॅनो युरिया - २० लाख बॉटल्स
  • नॅनो डीएपी - १० लाख बॉटल्स

संरक्षित खते

  • युरिया - १.५ लाख टन
  • डीएपी - २५ हजार मेट्रीक टन
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखते