Join us

पुराने हाहाकार उडालेल्या दुबईत कशी करतात शेती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 20, 2024 1:49 PM

तेलाचा साठा असणाऱ्या वाळवंटी अरबात खजूराशिवाय काय पिकतं? कशी करतात इथले लोक शेती?

रखरखीत हवामान आणि उन्हाळ्यात ५० अंश सेल्सियसपर्यंत पोहचू शकणारे तापमान अशा हवामानासाठी दुबई जगभरात ओळखले जाते. त्याच भागात आता पुराने अनेक इमारती, टाऊनशिप पुरामुळे जलमय झाल्या आहेत. तेलाचा प्रचंड साठा असणाऱ्या वाळवंटी संयुक्त अरबात खजूराशिवाय आणखी काय पिकणार? असा सामान्य समज. पण शेतीच्या अनेक आधुनिक तंत्रांसह या देशाने शेतीत प्रचंड प्रगती केली आहे. कशी केली जाते दुबईत शेती? खजूराशिवाय इथं आणखी काय काय पिकतं? 

तेल निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या या प्रदेशात उच्च तापमान, कमी पर्जन्यमान, नैसर्गिक जलमार्गांचा अभाव आणि निकृष्ट माती आहे. या देशातील बहुतांशी लोक खजूराचं उत्पादन घेतात हे खरं असलं तरी दुबई जगातील सर्वात मोठं व्हिर्टिकल फार्मिंगचं हब म्हणून लोकप्रीय होत आहे. सुमारे १ लाख ६० हजार हेक्टरवर युएईमध्ये लागवडीयोग्य शेती आहे.  

संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) दुबईत पुराने हाहाकार उडाला आहे. ७५ वर्षातील सर्वधिक पाऊस इथे पडल्याची नोंद झाली आहे. जलमय झालेल्या या शहराच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. बदलत्या पर्यावरणीय बदलांमुळे हा देश आधुनिक शेतीकडे कधीच वळला असल्याचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा अहवाल सांगतो. 

हेही वाचा- विश्लेषण: दुबईतील ढगफुटीचा भारतीय शेती व कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय?

अमिराती लोकांच्या लोकप्रीय क्रियाकलापांपैकी एक शेतीही आहे. रास अल खैमाह मधील दिकदाकाह, उम्म अल क्वाइनमधील फलाज अल मुअल्ला, फजैराहमधील किनारी क्षेत्र तर दुबईमधील अल अविर आणि अबु धाबीमधील अल ऐन, लिवा ओएसिस ही शेतकऱ्यांसाठी प्रमुख कृषी क्षेत्र आहेत.

व्हर्टिकल फार्मिंगचे जगातील मोठे हब

चकचकीत उंच इमारती आणि ग्लॅमर अशी ख्याती असणाऱ्या दुबईने रखरखीत शेतीसाठी नाविन्यपूर्ण तंत्र विकसित करण्यासाठी अनेक संस्थांच्या सहकार्याने संशोधन व विकासात गुंतवणूक केली आहे. मोठ्या इमारती असल्या तरी दुबई व्हर्टिकल फार्मिंगचे जगभरातले एक मोठे हब बनत आहे. उंट प्रजनन आणि भाजीपाला शेतीसाठी दुबईत अल अविर ही लोकप्रीय बाजारपेठ आहे. याशिवाय व्हर्टिकल फार्मिंग करत दुबई जगात भाजीपाला फळांची मोठी निर्यात करते.

कमी पाण्यात शेती

नुकत्याच आलेल्या पुराच्या तीव्रतेमुळे जरी दुबईत पाण्याची कमतरता आहे यावर विश्वास बसणं अवघड असलं तरी, भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी, जलस्त्रोतांची कमतरता क्षारपड जमिन हा इथला मोठा अडथळा आहे. पण अशा परिस्थितीत ३० हजार चौरस मीटरच्या शेतात ९०० टनाहून अधिक पालेभाज्या पिकवण्याची क्षमता या देशातील शेतकऱ्यांनी ठरवली आहे. जिथे शेतात पिकवलेल्या पिकांच्या तूलनेत ९५ टक्के कमी पाणी वापरून शेती केली जाते.

शेततळ्यांवर शेती

संयुक्त अरब अमिराती देशांमध्ये होणारी शेती ही बहुतांशी शेततळ्यांवर होते. आज या युएईमध्ये ३० हजाराहून अधिक शेततळे आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला यात ४००० ने वाढ झाली. १९८० नंतर अमिराती देशांमध्ये शेतीचा विकास दिसू लागला.

८० टक्के अन्नाची गरज आयातीवर

दुबई आणि इतर अमिराती देशांमध्ये मासेमारी आणि पोल्ट्री उत्पादनातही मोठी वाढ दिसून येते. या देशातील ९२ टक्के मागणी स्थानिक दुग्धव्यवसाय पूर्ण करतो. जगभरात अन्नसुरक्षेचे मोठे संकट असताना  या देशात जवळपास ८० टक्के अन्नाची गरज आयातीवर अवलंबून आहे. परिणामी शाश्वत अन्न उत्पादनाला चालना देण्यासाठी  दुबई व इतर अमिराती देश सेंद्रिय व अधुनिक शेतीपद्धतींकडे वळले आहे.

टॅग्स :दुबईपूरशेती क्षेत्रशेती