Join us

काय सांगताय! या गावांमधील शेळ्या चक्क नदीच्या पाण्यावरून चालत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 6:43 PM

निफाड तालुक्यात गोदावरीकाठच्या काही गावांमध्ये शेळ्या गोदापात्रातील पाण्यावर चालताना दिसत असून सध्या या गावांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वराहून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीकाठी त्र्यंबकेश्वर ते नांदुरमध्यमेश्वर पर्यंत अनेक मंदिरे, घाट आणि धार्मिक स्थळे आहेत. असेच एक धार्मिक ठिकाण म्हणजे निफाड तालुक्यातील कोठुरे. नांदुर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरला असल्याने येथे उन्हाळ्यातही पाणी असते. 

गेल्या काही दिवसांपासून कोठुरेच नव्हे, तर या भागातील नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक नागरिकांना चमत्कार पाहायला मिळत आहे. तो म्हणजे येथील नदीच्या पाण्यावर चक्क शेळ्या-बकऱ्या चालताना दिसत आहेत. भरलेल्या गोदाकाठात या शेळ्या चरताना काही फूट पाणी असलेल्या भागात पाण्यावर चालत आहेत. काही ग्रामस्थांनी तर म्हशीही पाण्यावर चालताना पाहिल्याचे सांगितलेय.

सध्या गावात सुटीत येणारी पाहुणे मंडळीही हा चमत्कार पाहायला आवर्जून जात आहे. केवळ कोठुरे गावातच नव्हे, तर नदीकाठी असलेल्या शिंगवे, करंजगाव अशा गावांतही हीच स्थिती असून तेथेही या चमत्काराची चर्चा आहे. मात्र हा चमत्कार काही जादूने नव्हे, तर मानवी चुकांमुळे घडला आहे. यामागे आहे पाण्यावर साठलेल्या जलपर्णी किंवा पानवेली.

पाण्यातील प्रदूषण आणि मानवी मलमूत्र गोदावरीच्या पाण्यात सोडल्यामुळे गोदावरी नदी दुषित होत असून पानवेलींची साम्राज्य वाढत आहे. काही दिवसांपूर्वी नदीला सोडलेल्या पाण्यामुळे पानवेलीची ही काही किलोमीटरची चादर आता नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्याजवळच्या गावांमध्ये अडकून बसली आहे. त्यामुळे धरणाच्या वरच्या दिशेला काही किलोमीटरपर्यंत गोदावरी नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरले आहेत. त्यामुळे या परिसरात नदीतले पाणीही मानवी डोळ्यांस दिसत नसून, एकमेकांमध्ये दाट वाढलेल्या पानवेलींचा पक्का थर पाण्यावर जमा झाला आहे. या थरावरून काठाला चरणाऱ्या शेळ्या आरामात पाण्यावर चालू शकत आहेत. तर काही ठिकाणी गाई-म्हशीही चालताना दिसत आहेत.

कोठुरे ग्रामस्थांनी सांगितले की काही दिवसांपासून या पानवेली नदीत आल्यात. त्यामुळे पाण्याला दुर्गंध येत असून सूर्यप्रकाश आणि ऑक्सीजन पाण्यात मिळत नसल्याने येथील पाणीही दुषित झाले आहे. हेच पाणी लिफ्ट पद्धतीने कोठुरेसह परिसरातील गावांना पुरवले जाते, त्यामुळे उन्हाळ्यात टॉयफॉईड, काविळ, अतिसार यासारख्या आजारांचे रुग्ण येथे हळू हळू वाढताना दिसत आहेत. जलपर्णींमुळे डासांचे साम्राज्यही झाले असून त्यामुळेही डेंग्यू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामात गर्क असल्याने सध्या तरी नागरिक किंवा पर्यावरणाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे चित्र आहे. मात्र ही पानवेली स्वच्छ करण्याची मागणी काठावरील गावातील लोक करत आहेत.

जलपर्णीचे दुष्परिणाम असेही जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणार्‍या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. 

जलपर्णीचा खत म्हणून उपयोगपशुखाद्यात आणि जैविक खत म्हणून जलपर्णीचा उपयोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गांडुळखत, कंपोस्ट खत म्हणून जलपर्णीचा वापर करता येऊ शकतो. मिथेनसारख्या बायोगॅसची निर्मितीही त्यातून करता येते. इतकेच नव्हे, बायो इथेनॉलची निर्मितीही त्यातून करता येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र यासाठी सरकारची इच्छाशक्ती आणि नागरिकांनी एकत्र येऊन जलपर्णीपासून खत निर्मितीचे प्रयोग केले, तर त्याचा फायदा परिसरातील शेतीला होऊ शकेल.

टॅग्स :जल प्रदूषणगोदावरीशेती