Join us

हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:43 AM

शेतकरी आर्थिक संकटात: केलेला खर्चही पदरी पडत नसल्याची ओरड

सलीम सय्यद

अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसगिक संकटावर मात करीत खरीप हंगामात पेरणी केली. त्यातच वेळेवर पाऊस न झाल्याने कुठे सोयाबीन उगवले नाही, तर कोठे दुबार पेरणी करूनपण अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. शासनाच्या धोरणामुळे सोयाबीनला भाव नाही. आधीच उत्पादन कमी व दरातील घसरणीमुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. परिणामी, अहमदपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीन घरीच साठवून ठेवले आहे.

शासनाने सोयाबीनला ४६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे. सध्या बाजारात यापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात दर वाढतील आणि पेरणी, मशागतीचा तरी खर्च निघेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, आता वर्ष उलटून नवीन खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? भाव ५००० च्या पुढे जातच नाही, अशी विचारणा शेतकरी एकमेकांना करीत आहेत.

यंदा अहमदपूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामात तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादन घेतले. पावसाने पाठ फिरवल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. कमी उत्पादनामुळे आज ना उद्या चांगला भाव मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी होता; परंतु शेतकऱ्याचे स्वप्न भंगण्याचे चिन्ह दिसत आहेत. सोयाबीन घरात पडून असून, बाजारात भाव नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. घरात सोयाबीन ठेवून वजनात घट होत असून एक तर भाव कमी आणि वजन कमी होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र दरात मोठी घट झाली आहे.

तालुक्यात सोयाबीनला पसंती...

■ अहमदपूर तालुक्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात. मात्र, मागील वर्षी पावसाने दोन महिन्यांचा खंड दिला होता.त्यामुळे पिके वाळून गेली तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती, त्यांनी स्प्रिंकलरद्वारे पिके जगविली. मात्र, मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न हाती आलेली नाही. त्यात बाजारात विक्री केल्यास अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. किमान शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी मिळावा, अशी आशा आहे.

नुकसान झाल्यावर पीकविमाही नाही

■ अहमदपूर तालुक्यात पावसाने दोन ते अडीच महिन्यांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे काही ठिकाणी शेतातील सोयाबीन वाळून गेले, अशा शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारही केली. मात्र, हाती काहीच आले नसल्याची शेतकऱ्यांमधून ओरड आहे, नैसर्गिक संकटामुळे पिके हातात आली नाहीत. किमान नुकसानीची मदत तरी विमा कंपनीने द्यायला पाहिजे होती, अशी अपेक्षा अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

बाजारात सध्या ४५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव

■ गतवर्षी नैसगिक समतोल बिघडल्याने शेतीला प्रचंड फटका बसला असून सोयाबीन पिके फूल अवस्थेत असताना पावसाने दडी मारली. त्यातच खरिपाची पिके धोक्यात आली होती. अज्ञात व्हायरस, यलो मोझेंकचे आक्रमण, विविध कर्ज काढून विविध प्रकारच्या फवारण्या केल्या; पण उतारात घट झाली आहे. सध्या तालुक्यातील बाजारपेठेमध्ये ४५०० ते ४६०० दर सोयाबीनला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हीच स्थिती असल्याने भाव वाढणार की घटणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :सोयाबीनशेतीबाजार