नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांद्याबरोबरच द्राक्ष पिकांचे देखील हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्षबागेच्या झाडांवर झालेल्या जखमांवर शास्त्रज्ञ मलमपट्टी करणार असून, शेतकऱ्यांना द्राक्षबाग व्यवस्थापनावर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील काही भागात 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यातील लासलगाव, येवला, निफाड आदी तालुक्यात द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे, कोठुरे, रौळस, पिंपरी, गोंडेगाव, कसबे सुकेणे, निफाड आदी गावांतील नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या (एनआरसीजी) पथकाकडून बुधवारी करण्यात आली.
बागांचे १०० टक्के नुकसान झाल्याची तक्रार
गारपिटीमुळे द्राक्ष वेलीच्या फांद्यांवर, खोडांवर झालेल्या जखमा, झाडाच्या खोडांवर आतून झालेल्या जखमा, पानांवर झालेले परिणाम या व इतर परिणामांची पाहणी शास्त्रज्ञांनी केली, कैलास भोसले, बाळासाहेब गडाख व इतर संचालकांनी दाक्षबागांच्या नुकसानीची माहिती पथकाला दिली. गारपिटीने तालुक्यातील द्राक्षबागांचे 100 टक्के नुकसान झाल्याचे द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
द्राक्षबागा जगविण्यासाठी ओढाताण
निफाड तालुकयातील उगाव रोडवरील नितीन कापसे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेला पथकाने भेट दिली. कापसे यांच्या साडेसात एकर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. पथक पाहणी करीत असताना कापसे यांच्या चेह-यावर दुःखद आणि नैराश्याचे भाव होते. पथकाने परिसरातील नऊ ते दहा नुकसानग्रस्त द्राक्षबागाची पाहणी केली. द्राक्ष संशोधन केंद्राच्या पथकाने आमच्या द्राक्षबागेला भेट देऊन दाक्षवेलीना कुठे जखमा झालेल्या आहेत. इतर काय नुकसान झाले, याची पाहणी केली. यावर पथकाचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असले तरी द्राक्षबागा जगविण्यासाठी व उभ्या करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या ओढाताण होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.