Join us

हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर देणार भर

By मुक्ता सरदेशमुख | Updated: August 3, 2023 12:28 IST

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर ...

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर देण्याच्या सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

 मंत्रालयात बुधवारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषी मंत्री श्री.  मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव महेंद्र घाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत माती परिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे असे मंत्री मुंडे म्हणाले. 

शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची मागणी आणि प्रतिसाद विचारात घेता आवश्यकता भासल्यास विद्यापीठातील माती परिक्षण केंद्रांची संख्याही वाढविण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

शेतीशाळांचे आयोजन करण्याच्या सूचना 

शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायशीर करण्यास सहाय्य करणे हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 5220 गावात सुरु आहे. या पहिल्या टप्प्यातील जुन्या गावांमधील कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोकसहभागीय नियोजन करावे. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात शेतीशाळेचे आयोजन करावे, असेही मंत्री मुंडे म्हणाले.

मागील काही वर्षातील हवामानातील बदलामुळे शेतीवर दुष्परिणाम जाणवत आहे. भविष्यातही हवामान बदलामुळे शेती क्षेत्राचे नुकसान होऊ शकते, यासाठी पूर्व नियोजन आणि उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच खरीप व रब्बीत घेतली जाणारी आंतरपिके आणि कडधान्य उत्पादनात वाढ व्हावी आणि बदलत्या वातावरणाला अनुकूल असे बियाणे विकसित व्हावे यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने नवीन संशोधन करण्यावर देखील भर देण्यात आहे.