Join us

खते बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, कृषी विभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:12 PM

शेतकऱ्यांनी खते, बियाणे कीटकनाशक खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गडचिरोली : शेतकऱ्यांना बियाणे, खतेकीटकनाशके आदी निविष्ठांची पूर्ती कृषी सेवा केंद्रांमार्फत केली जाते; परंतु त्यांच्याकडून शेतकऱ्यांना अनेकदा योग्य सेवा दिली जात नाही. यामुळे कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त होतात. शिवाय कृषी विभागाने केलेल्या तपासणीत सदोष आढळलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 13 कृषी केंद्रांवर मागील खरीप हंगामात निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते, बियाणे कीटकनाशक खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन, मका, व अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामातील लागवड क्षेत्र अधिक असल्याने कृषी विभागसुद्धा बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीवर लक्ष ठेवून असतो. मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची विशेष नजर होती. साठा पुस्तक न बाळगणे, पॉस मशीनवर विक्री न करणे, रेकॉर्ड न ठेवणे, तक्रारी आदी कारणांमुळे १३ कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्वांसाठी मागील खरीप हंगामात निलंबित केले होते. गुणनियंत्रक कक्षाच्या पथकाद्वारे ठिकठिकाणच्या कृषी केंद्रांवर धाड टाकून नमुने गोळा केले होते.

बोगस बियाणांचे तेलंगणा 'कनेक्शन'

गडचिरोली जिल्हा तेलंगणा व छत्तीसगड राज्याला चिकटून आहे. तेलंगणा येथे बोगस कापूस बियाणे तयार केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामात जूनच्या सुरुवातीलाच अहेरीमध्ये कृषी विभागाने छापा टाकून बीटी बियाणांचा साठा जप्त केला होता. हे कापूस बियाणे तेलंगणातून आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते, थोडासा नफा कमविण्यासाठी बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट कार्यरत असून त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे.

बियाणे जिल्ह्यात एकूण 772 कृषी सेवा केंद्रे आहेत. यापैकी ठराविक केंद्रांमधून बियाणांचे एकूण 488  नमुने कृषी विभागाने गोळा केले. यापैकी 25 अप्रमाणित आढळले, तर 20 कंपन्यांना सक्त ताकीद देण्यात आली. खते जिल्ह्यातून खतांचे एकूण 41 नमुने घेण्यात आले. यापैकी 26 नमुने अप्रमाणित आढळली. तर 13 कंपन्यांना ताकीद देण्यात आली. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. कीटकनाशके जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमधून कीटकनाशकांचे एकूण 119 नमुने कृषी विभागाच्या पथकाने गोळा केले होते. यापैकी दोन नमुने: अप्रमाणित आढळले. कृषी विभागाने पुढील कारवाई प्रस्तावित केली आहे.

कंपन्यांवर कोर्ट केस

कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमधून धान, कापूस, सोयाबीन आदींच्या बियाणांचे तसेच रासायनिक खतांचे नमुने गोळा करून तपासनीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. यापैकी बियाणांचे नमुने सदोष आढळल्याने 5 कंपन्यांवर कोर्ट केस करण्यात आली. तर खतांच्या नमुन्यांमध्ये 13 कंपन्यांवर कोर्ट केस करण्यात आली.  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम म्हणाले की, कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. खरीप हंगामात पथकाने धडक कारवाई करून तपासणी केली तसेच आवश्यक प्रकरणात कोर्ट केस व अन्य कार्यवाही केली. कृषी केंद्रांकडून फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नक्कीच तक्रार करावी.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रखते