Join us

"बँकांनो, शेतकऱ्यांकडून फक्त पीककर्जाची मुद्दल वसूल करा"; सहकार विभागाच्या सूचना

By दत्ता लवांडे | Published: March 20, 2024 8:28 PM

सहकार विभागाने यासंदर्भातील सूचना सर्व सहकारी आणि कृषी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना दिल्या आहेत.

पुणे : जे शेतकरी वेळेत आणि मुदतीच्या आतमध्ये पीककर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांच्या कर्जातील केवळ मुद्दल वसूल करावी. त्या शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेण्यात येऊ नये अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

दरम्यान, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका राज्यात सर्वांत जास्त पीक कर्जांचे वाटप करत असतात. तर मार्च अखेरीस शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज वसूलीसाठी तगादा लावण्यात येते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अ मधील अधिकारांचा वापर करुन 18 जून 2007 रोजी त्रिस्तरीय पतपुरवठा यंत्रणेमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्था यांना निर्देश देऊन शेतकरी पीक कर्जाची परतफेड प्रत्येक वर्षी विहित मुदतीत करत असल्यास अशा शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदानाची रक्कम वजा करुन परतफेडीची रक्कम वसूल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

याचाच अर्थ असा की, पीक कर्जाची विहित मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रक्कमेची वसूली करावी व अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ देण्यात यावा. तसेच, अशा शेतकऱ्यांना पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे. असंही परिपत्रकात म्हटलं आहे. 

सदरच्या शासनाच्या सूचना या कार्यालयाकडील संदर्भिय दि. 17/06/2021 रोजीच्या परिपत्रकाद्वारे पुन्हा निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये शासनाने अद्याप कोणताही बदल केलेला नसल्याने या सूचनांचे अनुपालन सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्याचप्रमाणे प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्थांनी करावे अशा सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबँक