Join us

आंबा मोहोर संरक्षण व फळमाशी नियंत्रण बद्दल कार्यशाळा पारुंडे गावात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:24 AM

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. डी. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आंबा पिकात विविध कीड व रोगांचा प्रादर्भाव आढळून येतो.

नारायणगांव कृषी विज्ञान केंद्र, मॅग्नेट आणि कृषी विभाग, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने पारुंडे येथे आंबा मोहोर संरक्षण व फळमाशी नियंत्रण विषयी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी किटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. डी. शिंदे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगांव प्रमुख डॉ प्रशांत शेटे, डॉ. दत्तात्रय गावडे (पिक संरक्षण तज्ञ), भरत टेमकर (उद्यानविद्या तज्ञ), योगेश यादव (मृदा शास्त्रज्ञ), मॅग्नेटचे ज्ञानेश थोरात, कृषी अधिकारी बापू रोकडे, प्रगतशील शेतकरी जितेंद्र पुंडे, जालिंदर पुंडे, नंदकिशोर पवार, मारुती जाधव व पंचक्रोशीतील आंबा उत्पादक शेतकरी मोढ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बी. डी. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आंबा पिकात विविध कीड व रोगांचा प्रादर्भाव आढळून येतो. विशेषतः मावा, तुडतुडे आणि मोहरावरील इतर रसशोषक किडींचा प्राुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरवातीला आढळतो. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजना करणे फायदेशीर राहील. यासाठी निंबोळी अर्काची करणे फायदेशीर राहील. पुढे ते बोलताना म्हणाले की आंबा पिकातील फळमाशी व्यवस्थापन करते वेळी प्रति एकर आठ कामगंध सापळा लावणे गरजेचे आहे.

डॉ. दत्तात्रय गावडे (पिक संरक्षण तज्ञ) यांनी आंबा पिकावरील रोग व्यवस्थापनवर मार्गदर्शन करताना म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे मोहर गळण्याचे प्रमाण जास्त असते. ढगाळ वातावरात व अवकाळी पाऊस यामुळे आंबा पिकातील मोहरावर करपा व भुरी रोगचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच आंबा पिकातील पर्णगुच्छ हा रोग काही भागात दिसून येत आहे त्याचे एकात्मिक रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

भरत टेमकर (उद्यानविद्या तज्ञ) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आंबा पिकाच्या जातीची लागवड, निवड हि विभागनुसार करावी तसेच अतिघन लागवड पद्धत व छाटणी याविषयी मार्गदर्शन केले. तर योगेश यादव (मृदा शास्त्रज्ञ) यांनी आंबा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्र नारायणगांव प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी आंबा पिकाची सद्यस्थिती व भौगोलिक मनंकानाचे फायदे याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत टेमकर यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले. या कार्यशाळेत जुन्नर तालुक्यातील सुमारे १०० आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :आंबाकृषी विज्ञान केंद्रनारायणगावकीड व रोग नियंत्रणफलोत्पादन