Join us

'या' जिल्ह्याने घेतला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा सर्वात जास्त लाभ

By दत्ता लवांडे | Published: March 17, 2024 11:16 PM

आत्तापर्यंत एकूण लक्षांकापैकी ४२ टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे.

पुणे : राज्यातील फळबाग लागवडीखालील क्षेत्र वाढण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने 100 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर 2022-23 आणि 2023-24 या दोन वर्षांमध्ये सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना 42 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. 

दरम्यान, मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर या योजनेच्या सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 2 लाख 42 हजार 470 एवढी होती. त्यापैकी 1 लाख 82 हजार 541 शेतकरी अपात्र ठरले आहेत. तर 59 हजार 929 शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत.

कृषी विभागाच्या 11 मार्च 2024 पर्यंतच्या अधिकृत माहितीनुसार 25 हजार 929 हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे लक्ष होते. त्यापैकी 15 हजार 925 हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे ध्येय साध्य झाले आहे. म्हणजेच एकूण भौतिक लक्षांकापैकी 61% क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले आहे. 

त्याचबरोबर या योजनेसाठीचा आर्थिक लक्षांक हा 153 कोटी 39 लाख एवढा होता. त्यापैकी 71 कोटी आठ लाख 60 हजाराची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेली असून त्यासाठी 29 कोटी 95 लाख 99 हजाराचा खर्च झालेला आहे. एकूण आर्थिक लक्षांकापैकी 42% आर्थिक लक्षांक साध्य झाला आहे. 

दरम्यान, सर्वात जास्त फळबाग लागवड करून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्याचा मान हा बुलढाणा जिल्ह्याला मिळाला असून या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 458 हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड झाली आहे.

सर्वात जास्त फळबाग लागवड झालेले जिल्हे

  • बुलढाणा - 1458 हेक्टर
  • नाशिक - 1287 हेक्टर
  • छत्रपती संभाजीनगर - 1264 हेक्टर
  • सांगली - 1260 हेक्टर
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीफलोत्पादन