Join us

कोंबड्यांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी 'या' शेतकऱ्याने काय केलं पहाच? वाचा सविस्तर

By गोकुळ पवार | Published: April 24, 2024 3:43 PM

राज्यभरात तापमान वाढले असून याचा परिणाम थेट पोल्ट्री व्यवसायावर देखील झाला आहे.

नाशिक : सध्या उन्हाची दाहकता वाढली असून माणसांबरोबर पशु पक्षांना देखील ही उष्णता धोकादायक मानली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमान सध्या चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने पशुपक्ष्यांमध्ये हिट स्ट्रोकचे प्रमाण देखील वाढले आहे. वाढत्या उन्हामुळे कोंबड्या गत प्राण होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय देखील धास्तावले आहेत. मात्र काही पोल्ट्री व्यावसायिक हे वेगळा प्रयोग करून कोंबड्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

राज्यभरात तापमान वाढले असून याचा परिणाम थेट पोल्ट्री व्यवसायावर देखील झाला आहे. तापमान वाढले असल्याने कोंबड्याना हिट स्ट्रोक होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक पक्षी वाचविण्यासाठी वेगवगेळ्या उपायोजना करण्यावर भर देत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावातील पोल्ट्री व्यावसायिक मुकुंद महाले. गेल्या सहा ते सात वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा सर्वाधिक तापमान असून ते कोंबड्याना धोकादायक आहे. यामुळे कोंबड्याना हिट स्ट्रोकचा धोका वाढत आहे. त्यामुळे थंडगार दह्याचा डोस देऊन कोंबड्यांमधील तापमान कमी करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

वाढत्या तापमानामुळे अनेक कोंबड्याचा हिट स्ट्रोकमुळे मृत्यू होत आहे. अनेक कोंबड्याना सर्दीही होत आहे. त्यामुळे अनेकदा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मृत्यू होत आहेत. तज्ञांच्या मते, कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यतचे तापमान सहन करू शकतात. या पोल्ट्री व्यावसायिकाने अतिशय योग्य व्यवस्थापन करत उष्णतेपासून कोंबड्याना वाचविण्यासाठी दह्याचा उपयोग केला आहे. शिवाय या प्रयोगामुळे मृत्युदर देखील कमी झाल्याचे ते म्हणाले.

या शेतकऱ्याने काय केलं? 

या शेतकऱ्याच्या 3 हजार पक्षांचा पोल्ट्री फार्म आहे. सध्याच्या तापमानाचा विपरीत परिणाम कोंबड्यांवर होऊ लागला आहे. उन्हामुळे त्रास होऊन या शेतकऱ्याच्या पंधराहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी, कुक्कुटपालनातील तज्ज्ञ यांच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तापमान कमी ठेवण्यासाठी जे जे उपाय करता येतील, ते करण्यात आले. मात्र उष्णता काही कमी होत नव्हती शेवटी उष्णता कमी करण्यासाठी दह्याचा वापर करण्याचे ठरविले. त्यानुसार प्रति हजार पक्षी अर्धा लिटर दही आणि अर्धा किलो साखर हे मिश्रण सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ड्रिंकर डोस करून दिले. या दरम्यान फार्ममध्ये फिरायचं नाही. यानंतर या शेतकऱ्याला निकालही चांगला येत असून मृत्यूदर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :शेतीतापमाननाशिकशेती क्षेत्र